आज अशा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला भेटूया ज्याने काही वर्षांपूर्वी संगमनेरच्या बस स्टॅण्डवर ज्यूस विकलं. तोच मुलगा काही वर्षात आज पुण्यात स्वतःच्या ४० लाखाच्या गाडीत फिरतो. हे यश जेवढं मोठं आहे तेवढंच हे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. ज्या मुलाने लहानपणीपासून ऐकलं आपण गरीब आहोत म्हणून आपली ऐपत बघून पाय पसरावे त्याच मुलाने हे यश मिळवले आहे.
हा मुलगा आहे नगर जिल्ह्यातील संगमनेरच्या एका सामान्य घरात जन्मलेला किरण गडाख. आईवडील शेतकरी. शेतीकरून या कुटुंबाचं घर चालायचं. किरण लहाणपणीपासूनच परिस्थिती जाणून होता. शाळेसोबतच तो लहानपणीच घरच्या शेतीत पिकवलेली टोमॅटो आणि इतर भाजीपाला सायकलवर विकायला जायचा. तो मार्केटमध्ये देखील भाजीपाला विकायला जायचा. किरणने तेव्हाच शिकलं कि जो गोड आणि मोठ्याने बोलतो त्याचाच माल लवकर विकतो.
किरणचं दहावीपर्यंत शिक्षण गावातच झालं. त्याला घरातल्या एका हुशार मुलाचं उदाहरण देऊन अभ्यास कर म्हणून सांगितलं जायचं. किरणदेखील दहावीला ९१ टक्के मिळवून पास झाला. त्याला सांगितलं जायचं कि दहावीपर्यंत शिक नंतर टेन्शन नाही. पण पुन्हा निकालानंतर सांगितलं गेलं कि अजून २ वर्ष अभ्यास कर नंतर लाईफ सेट. तेव्हा त्याला कळलं कि शिक्षण काही थांबणार नाही. अकरावी बारावी त्याने संगमनेर मध्ये केली. तिथं त्याला परिस्थितीसोबत झगडावं लागलं.
त्याचे जेवणाचे पैसे वाचावे म्हणून त्याला २५ किमी दूर संगमनेरला टिफिन पोहचवला जायचा. त्याला दोन्ही वेळेस तोच टिफिन खावा लागायचा. उन्हाळ्यात त्याला भाजी विटल्यावर अनेकदा उपाशी देखील राहावं लागलं. त्याला गरिबीचे चटके बसत होते. त्याचे रूम पार्टनर MBA चे विद्यार्थी होते. त्यांना एक प्रोजेक्ट आला ज्यात त्यांना एलोवेरा ज्यूसच्या बॉटल विकायच्या होत्या. त्यांनी किरणला त्याच्या परिस्थितीमुळे हे काम करण्यासाठी विचारणा केली. किरणला पैशाची गरज होती. त्याने संगमनेर बस स्टॅण्डवर ते ज्यूस बॉटल विकायला सुरु केलं.
लोक बघू नाही म्हणून तो लवकर हे काम करायचा. पण त्याला गावातल्या एका मित्राने बघितले आणि सर्व गावात त्याच्या कामाची बातमी पोहचली. त्याने त्यानंतर लाज सोडून द्यायचं ठरवलं. किरणला बारावीला ८८ टक्के मिळाले. लोक त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा करायला लागले. घरातल्या त्या हुशार भावाने इंजिनिअरिंग करण्यास सांगितलं. घरच्यांनी हा निर्णय घेऊनही टाकला आणि त्याला इंजिनिअरिंगला पाठवलं. आईच्या गळ्यातलं सोन्याचं विकून त्याची फीस भरली.
इंजिनिअरिंग सुरु असताना त्याला एक मार्केटिंग करण्याची संधी मिळाली. त्याने ते काम करत कॉलेज पूर्ण केलं. सर्व मित्र म्हणाले ते काम सोड आणि जॉब कर. पण किरण मात्र वेगळं काही करू इच्छित होता. त्याने आपलं स्वप्न घेऊन पुणे गाठलं. जिथे त्याची राहायची सोया नव्हती ना कोणी ओळखीचं होतं. १५ दिवस त्याने पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर झोपून काढले. त्याच्याकडे कौशल्य होते.
किरणचं आयुष्य तेव्हाच जास्त बदललं जेव्हा त्याने लोक काय म्हणतील हे विचार करणं सोडून दिलं. पुण्यात त्याने आपल्या बोलण्याच्या जीवावर कामाला सुरुवात केली. किरण आज मोठं मोठ्या उद्योजकांना धडे देतो. तो मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचं काम करतो. किरण आज २ कंपन्यांचा सीईओ असून त्याच्याकडे शिकण्यासाठी लोक दुरदुरून येतात. त्याच्याकडे १ लाखाहून अधिक लोकांनी प्रशिक्षण घेतलं असून तो अनेकांसाठी आज प्रेरणास्थान बनला आहे. किरणचा महिन्याचा टर्नओव्हर आज करोडो मध्ये असून त्याच्याकडे ऑडी सारख्या महागड्या गाड्या देखील आहेत.