लातूरच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावी ५ जून १९५० रोजी रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचा जन्म झाला. लहान वयातच आपल्या कुस्ती कौशल्याच्या जोरावर “हरी पैलवान” म्हणून त्यांनी नाव कमावले. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी दादूमामा चौगुलेंना पराभूत करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. त्याच वर्षी हिंदकेसरीची देखील गदा त्यांनी मिळवली. १९७२ साली दिल्लीच्या नेत्रपाल पैलवानाला हरवून त्यांनी रुस्तम-ए-हिंद हा किताब पटकावला.
रुस्तम-ए-हिंद झाल्यानंतर हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या पाठीमागे आर्थिक शुक्लकाष्ठ लागले. इकडे मामा एकामागून एक मैदान गाजवत असताना दुसरीकडे त्यांचे वडील मात्र जमिनीवर कर्ज काढून कर्जबाजारी बनत चालले होते. खुराकासाठी पैसे पाठवण्याएवढीही त्यांची परिस्थिती राहिली नव्हती. त्यामुळे हरिश्चंद्र मामांवर पुण्याच्या आसपासच्या गावात यात्रांमधील कुस्त्यांच्या फडावर खेळण्याची वेळ आली. कसेबसे त्यातून मिळणाऱ्या बक्षिसावर त्यांनी आपला खुराकाचा खर्च भागवला. १९७२ नंतरचा तो काळ त्यांच्यासाठी फार बिकट होता.
सतपालने महाराष्ट्र्राच्या पैलवानांच्या अक्षरशः माती चारली
१९७५ सालच्या कोल्हापूरच्या रुस्तम-ए-हिंद स्पर्धेपासून उत्तरकडील मल्लांनी महाराष्ट्रात धडका द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना धूळ चारत दिल्लीच्या बिर्ला आखाड्यातील गुरु हनुमान यांचा पठ्ठा असणाऱ्या सतपाल या पैलवानाने रुस्तम-ए-हिंद किताब मिळवला. कोल्हापुरातील पैलवान चेष्टेचा विषय बनले. एखादा पैलवान दिसला की लोक त्याला “ऐ सतपाल” म्हणून टिंगल करु लागले.
देशभरात सतपालच्या नावाचा दबदबा वाढला. त्यावेळचे महाराष्ट्रातील महान मल्ल दादूमामा चौगुले यांना तीनदा अस्मान दाखवून सतपालने आपली जरब बसवली. एका कुस्तीत तर सतपाल अक्षरशः दादुमामांच्या पायाला धरुन आखाड्याच्या मध्यभागी फरफटत आणतानाचे दृश्य पाहून महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. सतपाल विरुद्ध महाराष्ट्रात कोणीच जिंकू शकत नाही अशी त्याकाळची लोकांची भावना बनली.
सतपाल नावाच्या वादळाला चारीमुंड्या चीत करुन बिराजदार मामांनी महाराष्ट्राची लाज राखली
महाराष्ट्रातील एकही मल्लाचा सतपाल नावाच्या वादळापुढे निभाव लागत नाही हे पाहून हरिश्चंद्र मामा पेटून उठले. एव्हाना त्यांना पोटाचा त्रास सुरु झाला होता, प्रचंड वेदना व्हायच्या; पण मामा खचले नाहीत. अशातच बेळगावच्या सिद्राम पाटील नावाच्या कुस्ती ठेकेदाराने बेळगाव मुक्कामी महाबली सतपाल विरुद्ध हरिश्चंद्र बिराजदार अशा कुस्तीचे आयोजन केले.
वस्ताद गणपत खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या कुस्तीसाठी बिराजदार मामांनी अफाट कष्ट घेतले. वस्तादांनी सतपालच्या हुकमी डावावर सामने थंडर नावाच्या डावाची तोड काढली. या कुस्तीचा भरपूर प्रचार करण्यात आला. देशभरातून लाखो कुस्तीशौकीन बेळगावला निघाले. वर्तमानपत्रांनी या कुस्तीची बातमी करताना “महाराष्ट्राचा शेवटचा बुरुज लढत आहे” असे हेडिंग दिले.
११ जानेवारी १९७७ यादिवशी महाबली सतपाल विरुद्ध हरिश्चंद्र बिराजदार या ऐतिहासिक कुस्तीला सुरुवात झाली. हरिश्चंद्र बिराजदार मामांनी सतपालला आपल्या जाळ्यात खेचले आणि १४ व्या मिनिटाला विजेच्या चपळाईने त्यांना चारीमुंड्या चीत करुन महाराष्ट्रची लाज राखली. खचाखच भरलेल्या मैदानात हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या नावाचा जयजयकार झाला. दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली.