वास्तव, सिम्बा, जिस देस में गंगा रहता है, खाकी, सिंघम या सिनेमात आपल्या भूमिकांमुळे चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले जेष्ठ अभिनेते किशोर नांदलसकर यांचं आज दुपारी मुंबईत कोरोनाने निधन झालं. ८१ वर्षीय किशोर नांदलसकर यांनी मराठी नाटकामधून अभिनयाची सुरुवात करत बॉलीवूडमध्ये अभिनयाच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मागील २ हून अधिक दशकापासून ते चित्रपट सृष्टीत काम करत होते. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास..
किशोर नांदलसकर हे मुळचे कोकणातले होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खारेपाटण तालुक्यातील शेजवली हे त्याचं गाव. पण त्यांचा जन्म मुंबईतच झाला. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. तर त्याचं शिक्षण ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे झाले. त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरीही केली होती. वडिलांमुळे किशोर यांना देखील अभिनयाच वेड बालपणापासूनच लागले.
त्यांच्या कुटुंबात पत्नी, ३ मुलं, ३ सुना, नातवंडे असं परिवार आहे. १९६०-६१ च्या सुमारास रंगभूमीवर सादर झालेल्या ‘आमराई’ नाटकात त्यांनी पहिल्यांदा काम केलं होतं. घाटकोपर येथे एका वाडीत हे नाटक झाले होते. यात त्याना फक्त बाप्पा म्हणून हाक मारायची होती. पण ते रंगमंचावर गेल्यावर काहीच बोलू शकले नाही. प्रेक्षकांनी त्यांचा हुर्यो उडवला. पण ते तिथून शिकत गेले. त्यांनी काही वर्ष नोकरी करत नाटकात काम केलं. १९८० मध्ये दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ आणि अन्य कार्यक्रमात ते सहभागी झाले. त्यातून हळू हळू नाव झालं.
नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या भूमिका होत्या. नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली.
‘जिस देश में गंगा रहता है’ या सिनेमातील सन्नाटाची भूमिका त्यांना एक वेगळीच ओळख देऊन गेली. ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या मोठ्हिंया दी चित्रपटांतही त्यांच्या भूमिका होत्या. सन्नाटा मध्ये मुकी भूमिका असूनही त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या किशोर यांनी छोट्या छोट्या भूमिका केल्या पण त्यांच्या भूमिकाना चांगले मानधन मिळत असे. किशोर हे मोठी संपत्ती मागे सोडून गेले आहेत.
किशोर यांचा मुंबईतील नागपाडा मध्ये एक अलिशान बंगला आहे ज्यामध्ये ते कुटुंबासोबत राहायचे. नागपाडा मधील या बंग्ल्याशिवाय त्यांचे मुंबईत २ फ्लॅट आहेत. हे दोन्ही फ्लॅट त्यांनी किरायाने दिलेले आहेत. यातून त्यांना मोठं भाडं यायचं. किशोर यांच्याकडे एक इनोव्हा आणि एक फॉर्च्यूनर गाडी आहे. याशिवाय त्यांच्याकडे एक बस देखील होती जी ते किरायाने चालवायचे.