शेगावचे गजानन महाराज संस्थान आज जगभरात प्रसिद्ध आहे ते तेथील व्यवस्थापनामुळे. मंदिर परिसरातील स्वच्छता हे येथील सगळ्यात मोठे आकर्षण आहे. जगभरातील भाविक या संस्थानाला भेट देतात. पण परिसराची स्वच्छता मात्र नेहमीच अफलातून असते. याचे श्रेय जाते एका अशा अवलियाला जो आज एक खराखुरा भारतरत्न आहे. शिवशंकर भाऊ पाटील त्यांचं नाव.
धोतर, सदरा आणि गांधी टोपी या वेशात साधारण राहणीमान असणारे शिवशंकर भाऊ आज अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी शेगाव मध्ये केलेले अनेक प्रकल्प समाजोपयोगी असून अनेक गरजू त्यातून सेवा घेत आहेत. शेगाव संस्थान मध्ये त्यांनी ३ हजार सेवेकऱ्यांना अशी काही शिस्त लावलेली आहे कि येथे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होते.
लोक शेगाव संस्थानला फक्त दर्शनासाठी नाही तर विविध आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी देखील येतात. ४२ प्रकल्पांतून येथे अहोरात्र मानवाची सेवा सुरू आहे. फिरते रुग्णालय, अपंग पुनर्वसन केंद्र, विविध दवाखाने, शाळा, महाविद्यालय, यासह असंख्य गोष्टी येथे लोकांना मोफत पुरवल्या जातात. आनंदसागर हा जगाला वेड लावणारा प्रकल्प येथेच आहे. याचा संकल्प भाऊंचा, आर्किटेक्टही भाऊच. शेगाव संस्थानचे जे भक्त निवास आहेत तसे भक्त निवास कुठेच बघायला मिळणार नाहीत.
सध्या शिवशंकर भाऊ यांचे नाव सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी उभारलेला कोविड रुग्णालय. राज्य सरकारने एखाद्या गोष्टीसाठी कितीही निधी दिला तर तो कमीच पडतो हा आजपर्यंचा अनुभव. राजकीय नेत्यांना तर कितीही निधी दिला तो कमीच पडतो. मात्र शिवशंकर भाऊ याला अपवाद आहेत. शिवशंकर भाऊ यांनी आणि शेगाव संस्थानने आपल्या सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. राज्य सरकारने शेगाव संस्थानला कोविड सेंटर उभारण्यासाठी १० कोटींचा निधी दिला होता.
आता १० कोटी निधी आला म्हणजे त्यातला मनाला वाटेल तेव्हा वापरून ते एकतर स्वतःचं घर भरू शकत होते किंवा मग काहीही करू शकत होते. पण शेगाव संस्थानने मात्र त्या १० कोटींपैकी २ कोटी रुपयातच प्रशस्त कोविड रुग्णालय उभारलं. आणि उरलेले ८ कोटी रुपये शासनाला परत केले. याच ठिकाणी जर राजकीय नेते मंडळी असती तर काय केलं असतं हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही.
शेगाव येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणतीही गोष्ट जर मनात असेल तर कमी पैशात पूर्ण होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे. या कामाचा राज्यातील प्रत्येक संस्थानाने आणि प्रत्येक व्यक्तीने आदर्श घ्यायला हवा. शिवशंकर भाऊ पाटील यांनी यापूर्वीही असे काम केल्याचे अनेक उदाहरणं समोर आहेत. असाच एक किस्सा ७०० कोटींचा देखील आहे.
अमेरिकन बँकर असलेल्या विक्रम पंडित यांनी एकदा शेगाव संस्थानला काम करण्यासाठी ७०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. पण विश्वस्त मंडळाने एवढ्या पैशांचं काय करायचं म्हणून एक आराखडा तयार केला. किती पैसे लागतील याचा हिशोब केला. अन त्यातले किती पैसे परत फेडू शकतो याचं गणित बसवलं. अन विक्रम पंडित यांनी देऊ केलेले ७०० कोटी नाकारून त्यातले फक्त ७० कोटी रुपये घेतले. गजानन महाराजांचा गरजेपुरते घ्या आणि जे घ्याल ते परत करा हा संदेश ते तंतोतंत पाळतात.
गजानन महाराज यांच्या प्रेमापोटी विक्रम पंडितांनी ही रक्कम दिली. शरद पवार एकदा शिवशंकर भाऊंना पद्मश्री, पद्मभूषण साठी शिफारस करतो म्हणाले होते. पण ते कुठलेही पुरस्कार घेत नाहीत. एकदा सुप्रिया सुळे संस्थानला भेट द्यायला आल्या होत्या. त्यांनी सर्व बघून त्या स्तब्ध झाल्या होत्या. भाऊंना म्हणाल्या तुम्हाला तर भारतरत्न दिला पाहिजे. त्यावर भाऊंचे उत्तर होते ‘मला कशाला, ज्यांना भारतरत्न मिळाली, त्यातली काही मंडळी साबणाच्या जाहिराती करताहेत, अहो, काय भावनेने तुम्हाला एवढा मोठा सन्मान दिला. आणि तुम्ही काय करता आहात? मला कशाचीही हाव नाही. महाराजांनी सेवा करायला सांगितली. न बोलता सेवा करायची..’
आज मंदिराच्या व्यवस्थापन कौशल्याची स्तुती भारतातील नव्हे तर अमेरिकेतील हार्वर्ड सारख्या विद्यापीठाने केली आहे. शिवशंकर भाऊ हे वडिलांच्या मार्गदर्शनाने मंदिरात फरशी पुसण्यापासून सुरु केलेले त्यांचे काम संस्थेचे व्यवस्थापक बनण्यापर्यंत पोहचले आहे. ज्यावेळी त्यांनी सूत्र हाती घेतली तेव्हा संस्थेची उलाढाल हि फक्त ४५ लाख होती. आज तीच वार्षिक उलाढाल १४० कोटी रुपये आहे. मंदिराला बिजनेस न बनवता सेवा करण्याचे ठिकाण त्यांनी बनवून दाखवले आहे.