सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी. शेतकऱ्यांच्या नशिबात सरकारी कार्यालयांचे खेटे मारणे काही नवीन नाही. सरकारी अधिकारी नेहमीच शेतकऱ्यांना फेरे मारायला लावतात. असाच हा शेतकरी सरकारी कार्यालयांचे खेटे मारत होता. शिक्षित नव्हता. सरकारने काही योजनांची घोषणा केली होती त्याची त्याला माहिती हवी होती. पण तो लाचारपणे चकरा मारत होता अधिकाऱ्यांनी मात्र त्याच काम काही केलं नाही.
तो शेतकरी घरी निराश होऊन आला आणि अधिकाऱ्यांच्या वागण्याविषयी बोलू लागला. त्याचे हे बोलणे ९ वर्षाच्या मुलीने ऐकले. तिला वडिलांची हि लाचारीपणाची भावना खूप दुःखद वाटली. तिने त्याच दिवशी निर्धार केला कि आता आपण कलेक्टर व्हायचं. आज ती मोठ्या अभिमानाने महाराष्ट्राचे नाव एक सर्वोत्कृष्ट कलेक्टर म्हणून दक्षिणेत मोठं करत आहे. जाणून घेऊया तिचा जीवनप्रवास..
सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रुक या ५-६ हजार लोकसंख्या असलेल्या गावची एका शेतकऱ्याची मुलगी. गावातील एक सामान्य शेतकरी असलेल्या रामदास भाजीभाकरे यांची मुलगी रोहिणी. रोहिणी लहापणीपासूनच अभ्यासात हुशार होती. पण वडिलांना मिळालेल्या वागणुकीमुळे तिला आयुष्यात एक ध्येय मिळालं जे तिने पूर्ण करूनच दाखवलं. वडिलांच्या हालअपेष्टा तिच्याकडून बघितल्या नाही जायच्या.
रोहिणीचं दहावीपर्यंतचं शिक्षण उपळाई गावातच झालं. दहावी झाल्यावर बारावीच्या शिक्षणासाठी ती सोलापूरला गेली. शाळेत अभ्यासात हुशार असलेली रोहिणी नेहमीच टॉपर राहिली. बारावीनंतर रोहिणीने पुण्यात इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्या. पुण्याच्या नामांकित गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून तिचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. सरकारी शाळेनंतर सरकारी कॉलेजमध्येच तीच शिक्षण पूर्ण झालं.
इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब करण्याच्या भानगडीत ती पडली नाही. तिने लहानपणीच आयुष्याला एक ध्येय दिलेलं होतं. तिने त्याप्रमाणे UPSC ची तयारी सुरु केली. कुठलेही क्लास न लावता तिने स्वतःच अभ्यासाला सुरुवात केली. प्रचंड मेहनत घेतली आणि २००८ मध्ये हि शेतकऱ्याची कन्या IAS बनली. रोहिणीने तामिळनाडू मध्ये महिला कलेक्टर म्हणून केलेल्या कार्याची अनेकदा दखल घेण्यात आली आहे. तिला अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
रोहिणीने सालेम जिल्ह्याची पहिली महिला कलेक्टर म्हणून देखील इतिहास रचला आहे. १७९० पासून या जिल्ह्याला १७० कलेक्टर लाभले पण ते सर्व पुरुषच होते. रोहिणी या जिल्ह्याची पहिली महिला कलेक्टर होती. २००८ मध्ये रोहिणीला पहिली पोस्टिंग तामिळनाडूच्या मदुराई मध्ये सहायक जिल्हाधीकारी म्हणून मिळाली.
रोहिणी सांगते कि जेव्हा तीच ट्रेनिंग सुरु होतं तेव्हा वडिलांनी सांगितल होतं कि तुझ्या टेबलावर असंख्य कागद येतील त्यांना तू एक कागदाचा तुकडा म्हणून नको बघू. त्याच्यावरची सही अनेकांचं जीवन बदलू शकते. लोकांसाठी चांगलं काय याचाच नेहमी विचार कर. वडिलांच्या सल्ल्याने रोहिणी आज लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणारी महिला अधिकारी म्हणून ओळखली जाते.
रोहिणीने २००५ च्या बॅचचे अधिकारी विजयेंद्र बिदारी यांच्यासोबत लग्न केलं आहे. तिने तिच्या जिल्ह्याला पहिला हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून बहुमान मिळवून दिला आहे. तिच्या कामासाठी तिला सचिन तेंडुलकरच्या हस्ते सन्मानित देखील केले गेले आहे. एक्सलेंस इन इम्प्लीमेंटेशन ऑफ मनरेगा अवॉर्ड तिला मिळाला होता. हि शेतकऱ्याची मुलगी आज सामान्य माणसांसाठी नेहमीच उपलब्ध असते.