आपल्या इथे दूध म्हणजे संपूर्ण आहार मानला जातो. दुधामध्ये शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. लहान बाळांना त्यांच्या वाढीच्या काळात तर दूधच महत्वाचे असते. दुधामध्ये प्रोटिन्स, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी-२, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, आयोडीन, जीवनसत्व अ, ड, क आणि ई यासोबतच अनेक खनिजे व फॅट्स असतात.
दूधासोबतच दुधापासून बनणारे उपपदार्थ देखील मानवी आहारात मोठ्या प्रमाणावर असतात. असे असले तरी प्रत्येक प्राण्यापासून मिळणाऱ्या दुधामध्ये काही विशेष गुणधर्म आढळतात. त्यामुळे सर्वात उत्तम दूध कशाचे असते याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत.
१) गाईचे दूध : गाईच्या दुधाला आयुर्वेदात फार महत्व आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये गाईचे दूध फायदेशीर असते. गाईच्या दुधाच्या नियमित सेवनाने केसगळती कमी होते. मेंदूच्या विकासासाठी तसेच त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी गाईचे दूध प्राशन करण्याचा सल्ला दिला जातो. गाईचे दूध पचायलाही हलके असते. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी गाईचे दूध हा उत्तम आहार आहे. नवजात बालकांना गायीचे दूध दिले जाते. गायीचे दूध पित्तशामक असते.
२) म्हशीचं दूध : गाईच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या शरीरासाठी अनेक फायदे असतात. म्हशीच्या दुधात फॅट्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असते. तसेच कॅल्शिअम देखील अधिक प्रमाणात असते. ज्यांच्या शरीरात या घटकांची कमतरता असते त्यांना म्हशीचे दूध दिले जाते. स्नायूंच्या बळकटीसाठी म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो. चवीला देखील हे दूध गोड असते. कृश व्यक्तींना म्हशीच्या दुधाने चांगली झोप लागते, तसेच वजन वाढायलाही मदत होते. उच्च रक्तदाब आणि पोटाचे विकार असणाऱ्या लोकांनी म्हशीचे दूध घ्यावे.
३) बकरीचे दूध : लहान बाळांना गायीच्या दुधाऐवजी बकरीचे दूध देणे फायद्याचे असते, कारण बकरीचे दूध पचायला सर्वात हलके असते. बकरीच्या दुधातील फॅट्स बाळाच्या विकासासाठी आवश्यक असतात. हे दूध बाळांना पोटांच्या विकारापासून दूर ठेवते. बकरीचे दूध हा कॅल्शिअमचा उत्तम स्रोत असतो. त्यात लोह, व्हिटॅमिन अ यांचे प्रमाण अधिक असते. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी बकरीचे दूध घ्यावे. त्वचेचे आरोग्यही बकरीच्या दुधाने सुधारते.
४) गाढवीणीचे दूध : गाढविणीचे दूध हे गायी, म्हशीच्या दुधापेक्षाही पौष्टिक असते. सर्व प्रकारचे वातरोग या दुधाने बरे होतात. आईच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधात व्हिटॅमिन सी चे प्रमाण ६० पट अधिक असते, त्यामुळे एक वर्षाच्या आतील बालकांसाठी हे दूध अमृत मानले जाते. गाढविणीचे दूध वार्धक्य दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. गाढविणीचे दूध हे शक्यतो ताजेताजेच घ्यावे लागते. त्वचारोग, दंतरोग, डोळ्यांचे रोग, टीबी, मधुमेह यामध्ये गाढविणीचे दूध अत्यंत गुणकारी असते.