Monday , June 5 2023
Breaking News
Home / राजकारण / साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला आलेले शरद पवार त्याऐवजी आयटी पार्कची घोषणा करून गेले!

साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला आलेले शरद पवार त्याऐवजी आयटी पार्कची घोषणा करून गेले!

शरद पवार हे नाव राज्याच्या राजकारणात ५० वर्षाहून अधिक काळापासून कार्यरत आहे. पवारांनी आपल्या आयुष्यात आजपर्यंत अनेक चढउतार पाहिले. बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावात गोविंदराव आणि शारदाबाई पवार यांच्या पोटी शरद पवारांचा जन्म झाला. ते ११ भावंडांपैकी एक होते. आई शारदाबाई या सामाजिक कार्यात अग्रेसर असायच्या. त्या शेकाप या पक्षाचं देखील काम करायच्या. पण पवारांना मात्र लहानपणीपासून काँग्रेसचे आकर्षण होते. १९५८ साली युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सुरु झालेला त्यांचा प्रवास आमदार पदापासून केंद्रात मंत्रिपदापर्यंत पोहचला. एवढंच नाही तर त्यांनी इतरही अनेक पदं भूषवली.

१९६७ साली वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षीच शरद पवार पहिल्यांदा आमदार बनले होते. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना महत्वाचं गृहखाते देखील यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेने मिळाले होते. १९७८ मध्ये शरद पवारांनी काही आमदारांना सोबत घेऊन वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं होतं. आणि शेकाप जनता पार्टीची आघाडी करून ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी ४ वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. १९९० च्या दरम्यान शरद पवार हे मुख्यमंत्री असताना एक किस्सा घडला होता. तो किस्सा आजही खूप प्रसिद्ध आहे. एका कारखान्याचा उदघाटनाला गेलेल्या पवारांनी तिथे आयटी पार्कची घोषणा करून सर्वाना अचंबीत केलं होतं. जाणून घेऊया तो प्रसंग..

पुण्याला लागून असलेला सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये मुळा नदीच्या खोऱ्यात असलेला निसर्गसंपन्न मुळशी तालुका. १९९० च्या दशकात हिंजवडी हे एक दीडेक हजार लोकसंख्या असलेलं खेडेगाव या तालुक्यात होतं. दूध आणि भाजीपाला विकणे हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय होता.

१९९२-९३ च्या दरम्यान पुण्याचे खासदार होते नानासाहेब नवले. त्यावेळी त्या हिंजवडीच्या माळावर शेतकऱ्यांसाठी सहकारी साखर कारखाना काढण्याचं ठरलं. सर्व तयारी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे भुमीपुजन करण्याचं ठरलं. शरद पवारांना बोलवण्यात आलं.

शरद पवार या कारखान्याच्या शिलान्यासाला आले. मंडपात येऊन बसल्यावर पवारांनी त्या माळावर एक नजर फिरवली. त्यांना तो विस्तीर्ण माळरानाच्या परिसर खूपच आवडला. त्यांच्या डोक्यात विचारचक्रे फिरली. त्यांनी भूमिपूजनाचे आपले भाषण सुरु केले. भाषणात पवारांनी सर्वाना धक्का दिला. ते म्हणाले आज येथे मी कारखान्याचे भूमिपूजन जरी केले असले तरी येथे कारखाना होणार नाही. हि जागा हायवेजवळ आहे त्यामुळे येथे आपण आयटी पार्क बनवू अशी घोषणाच पवारांनी केली. कारखान्यासाठी महिनाभरात जवळच दुसरी जागा देतो असेही ते म्हणाले.

पवारांचे शब्द ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि कारखान्याच्या संचालकांनी विरोध दर्शवला. पण पवारांनी त्यांना आयटी चे त्याकाळी वाढत असलेले महत्व पटवून दिले. अन अखेर कारखान्याच्या जाग्यावर आयटीपार्क बनणार हे निश्चित झाले.

१९९८ मध्ये MIDC च्या माध्यमातून हिंजवडी मध्ये आयटी पार्क उभा राहिला ज्याला नाव देण्यात आले राजीव गांधी आयटी पार्क. कारण राजीव गांधींनी त्यावेळी देशात संगणक उत्क्रांती घडवून आणली होती. त्यांच्यामुळे संगणकाचा वापर देशात वाढला होता.

शरद पवारांच्या त्या निर्णयामुळे आज हिंजवडी आयटी पार्कची ओळख जगात पसरली आहे. इन्फोसिस, टीसीएस सह असंख्य आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्या आज हिंजवडी मध्ये आहेत. २८०० एकर जागेमध्ये आज १५० हुन अधिक आयटी कंपन्या आहेत. ज्यामधून जवळपास ३ लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. तर पुण्याची ओळख देखील आयटी हब म्हणून निर्माण झाली आहे. हिंजवडी आयटी पार्कमुळेच पुढे पुण्यात आयटीचं जाळं वाढलं आणि मगरपट्टासारखे इतरही मोठे आयटी पार्क तयार झाले आहेत.

About Mamun

Check Also

नसबंदीच्या बाबतीत हिटलरसुद्धा संजय गांधींचे पाय धुवून पाणी पिला असता

जर्मनीचा हुकूमशहा आणि नाझी पक्षाचा नेता असणाऱ्या एडॉल्फ हिटलरचे नाव जागतिक इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून घेतले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *