दादा कोंडके यांनी विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याद्वारे अवघा महाराष्ट्र गाजवला. या लोकनाट्याद्वारे त्यांनी नंतर मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकले आणि अख्खे मराठी सिनेविश्व देखील दणाणून सोडलं. दादा कोंडके यांनी सोंगाड्या या सिनेमाची निर्मिती करून चित्रपट निर्मितीत पाऊल ठेवले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर त्यांच्या कामाक्षी प्रोडक्शन ने १६ चित्रपटांची निर्मिती केली.
दादा कोंडके यांच्या पहिल्या सिनेमाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. याच सिनेमामुळे त्यांची अन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ओळख झाली होती. दादांचा हा चित्रपट लावण्यास मुंबईच्या कोहिनुर थिएटर मालकाने नकार दिला होता. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना दादा कोंडके भेटले होते. शिवसैनिकांनी दिलेल्या दणक्यानंतर हा चित्रपट रिलीज होऊ शकला होता.
त्यानंतर बाळासाहेब अन दादा कोंडके कट्टर मित्र बनले होते. त्यांच्या मैत्रीचे देखील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. दादा कोंडके यांच्या सोबत एका अभिनेत्रीचं नाव आठवतं. ती म्हणजे अभिनेत्री उषा चव्हाण. दादा कोंडके आणि उषा चव्हाण हि जोडी त्याकाळी सुपरहिट होती. दोघांच्या जोडीने अनेक चित्रपट केले. त्यांना देखील अवघ्या महाराष्ट्राने अफाट प्रेम दिलं. दोघांच्या जोडीचे अनेक चित्रपट आजही लोक आवडीने बघतात.
उषा चव्हाण या वयाच्या १६ व्या वर्षीच अभिनयात आल्या होत्या. त्यांनी सोळाव्या वर्षीच केला इशारा जाता जाता हा हा सिनेमा केला होता. या सिनेमानंतर त्यांची दादा कोंडके यांच्यासोबत भेट झाली होती. एके दिवशी त्या सातारा बस स्थानकाबाहेर बसची वाट बघत उभ्या होत्या. तिथे त्यांना दादा कोंडके यांनी पाहिलं. त्यांचं बोलणं झालं. त्यावेळी दादा सोंगाड्यासाठी अभिनेत्री शोधात होते. त्यांनी उषा चव्हाण यांना विचारणा केली. उषा चव्हाण यांची परिस्थिती देखील जेमतेम होती. त्यांना देखील पैशांची गरज होती. त्यामुळे त्या सिनेमासाठी लगेच तयार झाल्या.
उषा चव्हाण यांनी दादांचा सोंगाड्या स्वीकारल्यानंतर त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. पुढे उषा आणि दादा या जोडीने इतिहासच घडवला. दादा कोंडके यांच्या त्या आवडत्या अभिनेत्री होत्या इतकेच नाही तर दादा कोंडके यांना उषा यांच्याशी लग्नही करायचे होते. पण उषा यांनी लग्नास नकार दिला होता. उषा चव्हाण यांचे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ हे गाणं त्याकाळी खूप गाजले होते. उषा चव्हाण यांनी १०० हुन अधिक चित्रपटात काम केले आहे.
उषा चव्हाण यांच्यावर एकदा दादांसोबत एका सिनेमात काम करताना डोळा गमावण्याची वेळ आली होती. यासाठी कारणही त्याच होत्या. झालं असं कि हि सुपरहिट जोडी राम राम गंगाराम या सिनेमाचं शूटिंग करत होती. या सिनेमातील एका दृश्यात दादा कोंडके हे उषा यांना चापट मारणार होते. दादांनी उषाला हळू चापट लगावली. पण उषाला वाटले कि सिन खरा वाटणार नाही. तिने दादांना थोडी जोरात चापट मारायला सांगितली.
दादांना वाटलं तिला लागू नाही म्हणून त्यांनी हळू चापट लगावली होती. पण उषानेच सांगितल्याने त्यांनी नंतर अशी काही जोरदार थप्पड लगावली कि उषाचा डावा डोळाच अधू झाला होता. त्यानंतर त्यांना चषमा देखील लागला होता. हा प्रसंग त्यांच्या कायम स्मरणात होता. एकदा उषा चव्हाण यांनी दादांचा बदला म्हणून कि काय अमजद खान यांच्यासोबत एका सीनमध्ये अमजद खान यांना अशीच जोरात थप्पड लगावली होती. अमजद खानच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले असतील.