सध्या कोरोनामुळे रुग्णांना बेड मिळवणे खूप कठीण जात आहे. अनेक अशा घटना घडत आहेत जिथे बेडमुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक रुग्णांना बेड मिळाला तर व्हेंटिलेटर मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजनविना रुग्णांचे प्राण जात आहेत. HRCT स्कोर ज्या रुग्णांचा जास्त आहे त्यांना तर बेड खूप आवश्यक असल्याचं सध्या आपल्याला दिसत आहे. त्यांना महागडे इंजेक्शन देखील लागत आहेत. पण आज एक अशी सकारात्मक बातमी बघूया ज्यात एका ५८ वर्षीय आजीने कोरोनावर मात केली ते हि बेड न मिळून आणि HRCT स्कोर १७ असताना.
जळगाव जिल्हातील चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव गावच्या ५८ वर्षीय लताबाई आत्माराम पाटील. लताबाईंना आणि पती आत्माराम यांना थोडी तब्येत बरी नाही वाटली. त्यांनी कोरोना चाचणी करण्याचं ठरवलं. चाचणी केली असता दोघांचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आले. मुलगा नोकरीमुळे नाशिकमध्ये राहायला होता. तर कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यात परिस्थिती बिकट. डॉक्टरांनी लताबाईंना HRCT टेस्ट करण्यास सांगितले. ती केली असता त्यांचा स्कोर १७.२५ आला. एवढा स्कोर म्हणजे ऍडमिट होणे खूप गरजेचे होते. पण जळगाव जिल्हात कुठेच बेड शिल्लक नसल्याने संकट आलं.
मुलगा ज्ञानेश्वर नाशिकवरून गावाला पोहचला. मुलाने त्यांना नाशिकला न्यायचं ठरवलं. कारण ऍडमिट करणे तर आवश्यक होतं. रात्री २.३० वाजताच नाशिकला पोहचले. मित्रांच्या मदतीने बेड शोधण्यास सुरुवात केली. अनेक रुग्णालयात भटकंती केली पण बेड काही मिळत नव्हता. अनेक रुग्णालय पालथी घातली पण बेड काही मिळेना. मुलगा देखील निराश होऊन रडत होता तर आई देखील मुलाचे अश्रू बघून अस्वस्थ झाली.
ज्ञानेश्वर सर्वत्र प्रयत्न करत होता पण प्रयत्न निष्फळ होत होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या नंबरवर कॉल केल्यावर बिटको रुग्णालयात चार बेड असल्याचं कळलं ज्ञानेश्वरने अर्ध्या तासात रुग्णालय गाठलं पण तिथे बेड फुल्ल झाले आणि ४०० लोक देखील रांगेत होते. ज्ञानेश्वर निराश झाला होता पण लताबाई खंबीर होत्या. त्याच मुलाला काही होणार नाही म्हणून धीर देत होत्या.
लताबाईंना ज्ञानेश्वरने डॉ वडगावकर म्हणून एक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे नेले. त्यांनी काही औषधे दिली. लताबाईंनी घरीच उपचार करण्याचं ठरवलं. हे तसं बघायला गेलं तर खूप धोकादायक होतं. कारण १७ स्कोर असलेल्या रुग्णाला रेमडेसीवीर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि सलाईनची गरज भासते. पण लताबाईंनी या गोष्टींशिवाय कोरोनावर मात करून दाखवली. ते हि अवघ्या १० दिवसात.
या कोरोना लढ्यात लताबाईंसोबत होती त्यांची जिद्द, सकस आहार, रोगप्रतिकारशक्ती आणि इच्छाशक्ती. लताबाईंचे हे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी असून सकारात्मक राहणे गरजेचे आहे. कोरोनावर आपण कोणत्याही परिस्थितीत मात करू शकतो हेच यातून शिकायला मिळते. लताबाई यांच्यासोबत पती देखील १० दिवसात निगेटिव्ह झाले. लताबाईंनी पतीला देखील धीर देत कोरोनाशी लढण्यास प्रेरित केले.
लताबाई दररोज सकस आहार घेत. यामध्ये त्या अंडी, चिकन खाण्यावर भर देत. आणि महत्वाचे म्हणजे आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक मानसिकतेच्या बळावर त्यांनी १० दिवसातच कोरोनाला हरवले. कोरोनाशी लढताना लताबाईंचा हा पॅटर्न तुम्हाला प्रेरणा देईल अशी आशा आहे.