सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोना संकटात अनेक अशा गोष्टी आपण बघितल्या ज्यामध्ये लोक हे आपल्या जवळच्या नातेवाईकांना कोरोनामुळे दूर करत आहेत. काही काही असे देखील प्रसंग बघायला मिळाले जिथे स्वतःच्या आई वडिलांना मुलांनी कोरोनामुळे घराबाहेर काढले. तर कुठे कुठे नातेवाईक अंत्यसंस्कारास आले नाही म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्कार करावे लागले. पण या संकटात असे लोक बघायला मिळाले असले तरी रुग्णसेवा करणारे अनेक लोक देखील पुढे येऊन कोरोनाग्रस्तांची मदत सेवा करत आहेत. नुकतंच पारनेरचं एक उदाहरण बघायला मिळालं. जिथे स्वतःच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास मुलगा न आल्याने तहसीलदार मॅडम यांनी हे काम पार पाडलं.
आज आपण अशा २ अवलियांची माहिती घेणार आहोत जे कोरोनाग्रस्तांची सेवा करून माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. सध्या पुणे जिल्हा कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत देशात २ नंबरला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे रुग्णालयात जागा मिळत नाहीये. अनेकांना गरज असलेल्या औषधी मिळत नाहीयेत. तर ऍम्ब्युलन्स देखील कमी पडत आहेत. याला कारण आहे रोज वाढणारे मोठे आकडे.
जुन्नर तालुक्यात देखील कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. तालुक्यात रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी किंवा हे संशयित रुग्ण आहेत त्यांना चाचणी करण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत मिळत नाहीयेत. पण या संकटात मदतीला धावून आले तालुक्यातील एक युवा कार्यकर्ते सुरज वाजगे. सुरज शहाजी वाजगे या युवकाने आपली आलिशान इनोव्हा गाडी कोरोना रुग्णांना निशुल्क उपलब्ध करून दिली आहे. सुरज वाजगे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत.
त्यांच्या या इनोव्हा मधून संशयित रुग्णांना ये जा करण्यासाठी मदत होत आहे. वाढत्या रुग्णामुळे अनेकांना चाचणी करण्यास ये जा करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. खासगी वाहन तर दूरच सरकारी ऍम्ब्युलन्स देखील मिळत नाहीयेत. पण या गंभीर परिस्थितीत सुरज यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून मोठ्या नेत्यांना त्यांनी कशी रुग्णसेवा करत असतात हे दाखवून दिलं आहे.
सुरज वाजगे यांच्या गाडीसोबत त्यांचा ड्रायवर देखील निशुल्क आहे. नारायणगाव मध्ये आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते हि गाडी रुग्णसेवेकरीता देण्यात आली. जुन्नर तालुक्यातील गरजू रुग्णांनी ९८९०४७१७५५ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
सुरज वाजगे यांच्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे यांनी देखील हा उपक्रम सुरु केला आहे. रुग्णांची हेळसांड होऊ नये या भावनेने सोमनाथ काळे यांनी आपली गाडी ड्रॉयव्हरसह रुग्णाच्या सेवेसाठी दिली आहे. सोमनाथ काळे यांनी आपली ब्रिझा हि गाडी रुग्णांच्या सेवेसाठी दिली आहे. रुग्णांना गाडी मिळत नाही त्यामुळे परिसरातील २५ गावातील लोकांसाठी माझी गाडी २४ तास निशुल्क उपलब्ध करून दिल्याचे सोमनाथ काळे म्हणाले.