शरद पवार यांनी २-३ वेळा आपल्या भाषणात म्हणा किंवा मग मुलाखतीत म्हणा बाळासाहेबांच्या एका खास गोष्टीचा उल्लेख केला होता. ती गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे कधीच कोण्या नेत्याची जात बघत नसत. ते पक्षात एखाद्याला मोठं करताना त्या नेत्याचं फक्त कर्तुत्व बघायचे. असे करणारे बाळासाहेब महाराष्ट्रातील एकमेव नेते असल्याचं देखील सांगितलं होतं. हे सांगताना शरद पवार हे एक उदाहरण देखील सांगत. ते उदाहरण होतं चंद्रकांत खैरे याचं. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे असे नेते आहेत ज्यांनी खूप बिकट परिस्थितीमधून आपली कारकीर्द सुरु केली आणि एक कामगार ते मंत्री अन खासदार असा प्रवास केला.
जाणून घेऊया खैरे यांचा एक कंपनीत काम करणारा कामगार ते शिवसेनेचा राज्यातील मंत्री व ४ वेळा खासदार असा प्रेरणादायी प्रवास..
औरंगाबाद मधील मछली खडक येथे एका अत्यंत सामान्य अशा अल्पसंख्याक असलेल्या बुरूड (वीरशैव लिंगायत) समाजात चंद्रकांत यांचा जन्म झाला. वडील भाऊराव हे स्वातंत्र्य सैनिक होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून देखील वडील काम करायचे. मछली खडकवरील घरात चंद्रकांत यांचे बालपण गेले. दिवाण देवडीच्या ‘विन ऍन्ड कुल’ शाळेत ते शिकले. पुढे खैरे चेलीपूरा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. पुढे मॉडेल मिडल शाळेतही शिकले.
सातवी-आठवीत असतांना चंद्रकांत खैरे यांनी मित्रासोबत ‘लोकनेता’ हा पेपर देखील विकला. पाच पैसे किंमत असलेल्या पेपरचा गठ्ठा सायकलवर घेऊन ते विकायचे. कमिशनच्या पैशातून भजी -जिलेबीवर ताव मारायचे. पण एकदा वडिलांना कळले आणि चांगलीच खरडपट्टी निघाली. मग पेपर वाटणं बंद झालं. पुढे दहावीनंतर आयटीआय आणि मराठी स्टेनोचा कोर्स पुर्ण केल्यावर खैरे डेक्कन फ्लोअर मील मध्ये सुपरवायजर म्हणून नोकरीला लागले.
लहानपणापासूनच चंद्रकांत खैरे यांना धार्मिकतेची ओढ होती. राजूर येथील गणपतीवर त्यांची निस्सीम श्रध्दा आहे. १९७४ पासून आजपर्यंत चतुर्थीचे दर्शन त्यांनी कधीच चुकवलं नाही बस, टेम्पो, ट्रक, रेल्वेने राजूरला ते राजूरला गेलेले आहेत. डेक्कनमध्ये नोकरी लागल्यावर चंद्रकांत यांनी आल्वीन पुष्पक स्कूटर घेतली होती.
आठवी नववीत शिकत असतांना औरंगाबादमध्ये मार्मिक यायचे. खैरे यांना हे साप्ताहिक खूप आवडायचे. गुलमंडीवर अंक मिळाला नाही की मग मित्र रतनकुमार घोंगतेसोबत ते रेल्वेस्टेशनला बसने जायचे आणि मार्मिकचा अंक घेऊन यायचे. तेव्हापासून शिवसेना व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आकर्षण होते. त्यातूनच मग शिवसेनेची पहिली शाखा नवाबपुऱ्यात उघडली. १९८५-८६ मध्ये चंद्रकांत खैरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख झाले व पुढे शहरप्रमुख झाले.
ते राजकारणात चांगलेच सक्रीय झाले. त्यांच्या मागे त्यांच्या समाजाची २ हजार मतं देखील नव्हती. त्यामुळे राजकारणात त्यांना यश मिळेल का हा प्रश्न पडू शकतो. पण ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत होते. तेव्हा बाळासाहेब हे कोणाचीच जात बघत नसत. १९८८ च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत खैरे यांनी शहराच्या जुन्या भागातून म्हणजे गुलमंडी वॉर्डातून महापालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकले देखील. चांगलं काम करत राहिले. पक्षात वजन वाढलं. बाळासाहेबांपर्यंत नाव पोहचलं. शहरातही दबदबा वाढला. १९९० मध्ये पक्षाने थेट आमदारकीचे तिकीट दिले.
कॉंग्रेस पक्षाचे मातब्बर नेते जावेद हसन यांचा तीस हजार मतांनी पराभव करीत त्यांनी शिवसेनेचा झेंडा फडकवला आणि आमदार झाले. पुढच्या निवडणुकीत तर कमालच केली. राजेंद्र दर्डा यांचा तब्बल ५५ हजार मतांनी पराभव केला. पक्ष आणि बाळासाहेब खूप खुश झाले. शिवसेनेची राज्यात भाजपसोबत सत्ता देखील आली. बाळासाहेबांनी खैरेंना मंत्रिपद दिलं. पुढे १९९९ मध्ये लोकसभेचे तिकीट खैरेंना मिळाले. त्यानंतर ते सलग ४ वेळा औरंगाबाद मधून खासदार म्हणून निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्यांना एमआयएम च्या इम्तियाज जलील यांच्याकडून थोडक्यात पराभवाचा सामना करावा लागला.
१९९९ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचा पराभव केला होता. त्यावेळी त्यांना ३,८३, १४४ मतं मिळाली होती तर अंतुलेना ३,२७,२५५ मतं मिळाली होती. २००९ ची लोकसभा निवडणूक त्यांना अवघड गेली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर कॉंग्रेसच्या उत्तमसिंग पवार यांचे आव्हान होते. पण सोबतच अपक्ष म्हणून शांतिगीरी महाराज उभे राहिल्याने खैरे यांचे खूप मतं त्यांनी खाल्ली होती. पण थोडक्यात त्यांचा विजय झाला. एक कामगार म्हणून काम केलेल्या खैरेंनी नगरसेवक, आमदार, खासदार असा प्रवास केला आहे.