Monday , June 5 2023
Breaking News
Home / महाराष्ट्र / स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला पण शंकररावांनी जायकवाडी पूर्ण होईपर्यंत हार मानली नाही!

स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला पण शंकररावांनी जायकवाडी पूर्ण होईपर्यंत हार मानली नाही!

महाराष्ट्रात असंख्य छोटी मोठी धरणे आहेत. पण धरणांमध्ये असे काही धरणं आहेत जी खूप महत्वाची आणि ऐतिहासिक आहेत. खासकरून आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात पैठण येथे असलेलं नाथसागर म्हणजेच जायकवाडी धरण. जायकवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे. या धरणाचे मराठवाड्याच्या विकासात मोठं योगदान राहीलं आहे. जाणून घेऊया जायकवाडी धरणाचा रंजक इतिहास..

नाथसागर म्हणजेच जायकवाडी धरण हे मराठवाड्याची तहान देखील भागवते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ऐतिहासिक भूमीत वसलेल्या या धरणाची क्षमता १०२ टीएमसी आहे. १९७६ साली गोदावरी नदीवर हे धरण बांधण्यात आलं होतं. या धरणाच्या निर्मितीची गोष्ट देखील खूप रंजक आहे. आज जायकवाडी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक महत्वाचं धरण बनलं आहे.

नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याच्या नशिबात जायकवाडीच्या निर्मिती हा एक सुवर्णक्षणच म्हणावा लागेल. कारण दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यातील जवळपास २.४० लाख हेक्टर क्षेत्र हे जायकवाडीमुळे ओलिताखाली आले आहे. तसं बघायला गेलं तर पूर्णपणे माती आणि दगडांपासून बनवलेल्या या धरणाचे काम १९६५ मधेच सुरु झालं होतं. पण हे काम पूर्ण व्हायला ११ वर्ष लागले. १९७६ साली जायकवाडीचं काम पूर्ण झालं.

औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व नांदेड या जिल्ह्यांमध्ये अगदी पिण्यासाठी उन्हाळ्यात टँकरची वेळ यायची. आजही काही भागात हि वेळ येते. पण जायकवाडी धरण जेव्हा १०० टक्के भरते तेव्हा मात्र या चार जिल्ह्याचा २ वर्षांचा पाणीप्रश्न मिटतो. १९९७ मीटर लांबी असलेल्या जायकवाडीची उंची हि ४१.३ मीटर आहे. धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामुळे औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यात लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांचा सिंचनाचा प्रश्न मिटतो.

या धरणाच्या निर्मितीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे विशेष प्रयत्न आणि त्यांची जिद्द कामी आली होती. या धरणाच्या निर्मितीतून मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा आणि उद्योग धंदे वाढवण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो हे शंकररावांनी ओळखलं होतं. त्यांनी हे धरण बनवण्याचं मनावर घेतलं आणि त्यादृष्टीने काम सुरु केलं. पण या निर्मितीसाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. मुख्यमंत्री असलेल्या शंकररावांना वाटलं देखील नसेल कि त्यांना देखील अडचणी येतील. पण त्यावेळी विरोधक धरण पूर्ण होऊ नये म्हणून खूप एकवटले होते. पण मराठवाड्याच्या या भूमिपुत्राने जीवाची बाजी लावली आणि हे धरण पूर्ण करून दाखवलं.

जायकवाडीच्या निर्मितीसाठी शंकररावां वर मरण ओढवणारा प्रसंग देखील आला होता. धरणाच्या विरोधकांनी कोणत्याही परिस्थितीत धरण होऊच द्यायचं नाही असं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी अगदी मुख्यमंत्री असलेल्या शंकररावांना संपवण्याचा प्रयत्न केला. झाले असे कि शंकरराव एके दिवशी शेवगावला जात होते. एका डोंगराच्या पायथ्यापासून त्यांची गाडी जात होती. त्याच दरम्यान त्यांच्या गाडीवर मोठमोठे दगड गडगडत आले. ते दगड गाडीवर पडतील असा विरोधकांनी प्लॅन केला होता. पण शंकरावांची गाडी यातून थोडक्यात बचावली.

अगदी काही फूट गाडी पुढे गेली आणि ते दगड रस्त्यावर गडगडत येऊन पडले. हा जीवघेणा प्रसंग कोणी घडवला हे शंकररावांनी ओळखलं पण ते डगमगले नाहीत. त्यांनी धरण करूनच दाखवलं. अगदी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याना उदघाटनाला बोलावलं आणि १८ ऑक्टोबर १९६५ रोजी उदघाटन केलं. आणि १९७६ मध्ये धरण पूर्ण झालं. लाल बहादूर शास्त्री यांच्याशिवाय इंदिरा गांधी यांचे पाय देखील धरणाच्या मातीला लागलेले आहेत.

पैठणच्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पैठणच्या शाळेत तर हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातून बीए एलएलबी पूर्ण केली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे ते वडील होते. नांदेडच्या नगरपरिषद अध्यक्ष पदापासून त्यांची कारकीर्द सुरु झाली होती.

About Mamun

Check Also

…जेव्हा नितीन गडकरींनी दिल्लीत भारत सरकारचा बोर्ड उखडून लावला होता महाराष्ट्राचा बोर्ड!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचे असंख्य किस्से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *