सध्या आयपीएलचं चौदावा सीजन सुरु आहे. जसं जसं हे सीजन पुढे जात आहे तसं आता सामन्यांमध्ये रंगत यायला सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या आयपीएलपूर्वी मिनी ऑक्शन पार पडलं होतं. यामध्ये अनेक भारतीय नवोदित खेळाडूंना मोठी किंमत देऊन संघानी खरेदी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रदर्शनाकडे सर्वांचं लक्ष होतं. चांगलं प्रदर्शन करण्यात अनेक नवोदीत खेळाडू यशस्वी देखील झाले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा चेतन साकरिया, RCB चा गोलंदाज हर्षल पटेल, पंजाब किंग्सचा शाहरुख खान, दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान, RCB चा देवदत्त पड्डीकल या खेळाडूंनी छाप सोडली आहे.
या खेळाडूंप्रमाणेच युवा भारतीय खेळाडूंनी आयपीएलच्या सुरुवातीच्या सिजनमध्ये आपआपल्या टीमला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात मोठं योगदान दिलं होतं. काही तर आयपीएल ट्रॉफी विजयाचे शिल्पकार होते. पण या खेळाडूंना पुढे ना टीमने विचारलं ना संघ मालकांनी. हे खेळाडू क्रिकेटमधून अज्ञातवासातच गेले. आपल्या टीमला आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या या खेळाडूंवर पुढे बोली देखील कोणी लावली नाही. त्यांना त्यांच्या बेस प्राईसमध्ये देखील संघानी खरेदी केलं नाही. ते खेळाडू आज घरी बसले आहेत. जाणून घेऊ कोण आहेत हे खेळाडू..
१. स्वप्नील असनोडकर- आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली. पहिल्या सिजनमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने शेण वॉर्नच्या कप्तानीमध्ये आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयात स्वप्नील असनोडकरचं देखील मोठं योगदान होतं. स्वप्नील त्या सिजनमध्ये आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ सोबत ओपनिंगला फलंदाजी करत असे. त्याने ओपनर म्हणून अनेक मोठ्या इनिंग खेळल्या होत्या. आयपीलच्या पहिल्याच सिजनमध्ये त्याने ९ सामन्यात १३४ च्या स्ट्राईक रेटने ३११ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर त्याची बात शांत झाली आणि तो पुन्हा टीममध्ये दिसलाच नाही.
२. पॉल वल्थाटी- पॉल वल्थाटीची फलंदाजी ज्याने बघितली तो त्याच्या फलंदाजीचा फॅन होत असे. डावखुरा फलंदाज असलेल्या वल्थाटीने २०११ च्या सिजनमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. त्याने जबरदस्त प्रदर्शन करत किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खूप धावा बनवल्या होत्या. पॉल वल्थाटीने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ६३ बॉलमध्ये १२० धावांची खेळी करून सर्वांचे हृदय जिंकले होते. तो रातोरात भारतात स्टार झाला होता. त्या सिजनमध्ये त्याने ४८३ धावा केल्या होत्या. तो सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सहाव्या स्थानी होता. तो लवकरच भारताच्या टीममध्ये येईल असं देखील त्यावेळी बोललं जायचं. पण तो पुढे आयपीएलमधून गायबच झाला.
३. मनविंदर बिस्ला- मनविंदर बिस्लाला कोलकाता नाईट रायडर्सचे फॅन अजूनही विसरले नसतील. KKR ने २०१२ मध्ये आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. या विजयात बिस्ला मोठा हिरो होता. २०११ ते २०१४ मध्ये त्याने KKR साठी खूप धावा केल्या. २०१२ च्या आयपीएल फायनलमध्ये बिस्लाने ४८ बॉलमध्ये ८९ धावा ठोकल्या होत्या. त्याच्या या खेळीच्या बळावर बलाढ्य चेन्नईला कोलकाता ने फायनलमध्ये हरवलं होतं. CSK च आयपीएल ट्रॉफी विजयच्या हॅट्रिकचं स्वप्न त्याने तोडलं होतं. त्यानंतर मात्र तो पुन्हा आयपीएलमध्ये जास्त दिसला नाही. आज तो घरी बसलेला आहे.
४. मनप्रीत गोणी- पंजाबच्या मनप्रीत गोणीची उंची खूप होती. तो आयपीएलच्या पहिल्या सिजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. त्याने पहिल्या सिजनमध्ये १७ विकेट घेऊन खूप प्रशंसा मिळवली होती. बॅटिंग मध्ये देखील त्याने चांगले रन बनवले होते. त्याच्या या प्रदर्शनामुळे त्याला भारतीय संघात देखील स्थान मिळाले होते. पण हाँगकाँग आणि बांगलादेश विरुद्ध अपयशी ठरल्यानंतर त्याचं करिअर संपलं. २०१३ मध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसला होता. पण चांगली कामगिरी न केल्याने तो पुन्हा आयपीएलमध्ये दिसलाच नाही.
५. कामरान खान- मुंबईतील एका टी २० चषकातील कामगिरीमुळे कामरानची आयपीएलमध्ये एंट्री झाली. त्याला राजस्थान रॉयल्सने खरेदी केलं. २००९ मध्ये दुसऱ्या आयपीएल मध्ये त्याने आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजामुळे सर्वांना प्रभावित केले होते. त्याची ऍक्शन खूप वेगळी होती. त्याच्या ऍक्शनवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाले होते. त्यामुळे त्याचं करिअर देखील लवकरच संपलं. त्याने २०११ मध्ये ऍक्शन मध्ये बदल करून पुणे वॉरिअर्सकडून काही सामने देखील खेळले. पण तो पुढे चमकला नाही आणि आयपीएलमध्येही दिसला नाही.