भारतीय क्रिकेट संघाचा सध्या क्रिकेटमध्ये दबदबा बघायला मिळत आहे. मागील काही सिरीजमध्ये अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या नवख्या खेळाडूंनी केलेली कामगिरी जबरदस्त आहे. युवा खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावरच भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत धूळ चारली. नंतर आता नुकतंच इंग्लंड संघाला तर टेस्ट, टी-२० आणि वनडे अशा तिन्ही सिरीजमध्ये पराभूत केले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध विजयात भारताच्या एका खेळाडूने महत्वाची भूमिका निभावली.
तो खेळाडू म्हणजे भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत. ऋषभ पंतने मागील २ वर्षात केलेल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्ययक सामन्यात त्याने महत्वाची खेळी केली. तर इंग्लंडविरुद्ध देखील विजयात तो हिरो ठरला. वर्षभरापूर्वी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणारा हा क्रिकेटर आज भारताचा महत्वाचा मॅच फिनिशर बनलाय. जाणून घेऊया त्याचा संघर्षमय जीवनप्रवास..
४ ऑक्टोबर १९९७ रोजी उत्तराखंड मधील हरिद्वार मध्ये ऋषभ पंतचा जन्म झाला. रुढ़की हे त्याच छोटंसं गाव. क्रिकेटर बनण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. त्याचा जन्म झालेल्या उत्तराखंड मध्ये क्रिकेटला जास्त भविष्य नव्हते. तिथं क्रिकेट शिकण्यासाठी चांगले कोच देखील नव्हते. ऋषभच्या वडिलांना क्रिकेटची खूप आवड होती.
ऋषभ जेव्हा रुढ़की मध्ये क्रिकेट खेळायला लागला तेव्हा त्याने एका चषकात ५ सामन्यात ११५ धावा केल्या. त्याला मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड मिळाला. तेव्हापासून त्याला क्रिकेटर म्हणून आजूबाजूच्या परिसरात ओळख मिळत गेली. ऋषभ ने क्रिकेटर बनण्याचं काही ठरवलं नव्हतं. पण वडील मात्र तो क्रिकेटर बनावा यासाठी आग्रही होते. ऋषभचे शिक्षण रुढ़की मधेच झाले.
ऋषभने देखील मग दिल्लीला जाऊन क्रिकेटचे धडे घेण्याचे ठरवले. तो दिल्लीला सुरुवातीला रुढ़की वरून अपडाऊन करायला लागला. प्रवास दूरचा असल्याने अडचणी येत होत्या. व्हिडीओ गेम खेळायचा त्याला शौक होता. गेम पार्लर वाल्यासोबत ओळख झाली. अनेक रात्री त्याने दिल्लीत त्या पार्लरमध्ये देखील काढल्या. पण आईला काळजी वाटत असे. नंतर आई आणि तो दिल्लीला येत असे. ऋषभ रुढ़की वरून ६ घंटे प्रवास करून दिल्लीला प्रॅक्टिस करायला येत असे.
त्याने अनेक दिवस रात्र या दिल्लीच्या एका गुरुद्वारात काढल्या आहेत. दिवसा प्रॅक्टिस आणि रात्री गुरुद्वारामध्ये मुक्काम तो करत असे. आई देखील सोबत यायची. आई दिवसा त्या गुरुद्वारामध्ये लोकांची सेवा करत असे. ऋषभच्या वडिलांनी कोच देवेंद्र शर्मा यांची दिल्लीत भेट घालून दिली होती. त्यांनी ऋषभच टॅलेंट तेव्हाच ओळखलं जेव्हा ऋषभने अंडर १२ चषकात तीन शतक झळकावले होते. ऋषभला नंतर दिल्लीच्या एअरफोर्स स्कुलमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर त्याने मागे वळून कधी पाहिलेच नाही.
ऋषभ पुढे दिल्ली संघाकडून रणजी खेळण्याची संधी मिळाली. संधीचे सोने केले. २०१६ च्या अंडर १९ वर्ल्डकप मध्ये त्याचा भारतीय संघात नंबर लागला. नेपाळविरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक झळकावून त्याने तेव्हाच आपले कौशल्य दाखवून दिले होते. नामीबिया विरुद्ध शतक झळकावून त्याने भारताला सेमीफायनल मध्ये देखील पोहचवले. त्याच दिवशी त्याला दिल्ली संघाने आयपीएलमध्ये १.९ कोटीला खरेदी केले.
आक्रमक फलंदाजीची आवड असणाऱ्या ऋषभने २०१६-१७ मध्ये झारखंड विरुद्ध ४८ चेंडूत शतक झळकावले होते. २०१७ मध्ये आयपीएलच्या दरम्यान ऋषभच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी पंतचे वय फक्त २० वर्ष होते. अंत्यसंस्कार करून २ दिवसात पंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला होता. त्यावेळी RCB विरुद्ध अर्धशतक देखील त्याने झळकावले होते. त्याच्या या साहसाचे खूप कौतुक झालं होतं.
ऋषभ पंतने २०१८ मध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्टमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये त्याने कमी काळातच अनेक कीर्तिमान आपल्या नावावर केले आहेत. ऋषभने २०१८ मधेच वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मध्ये पदार्पण केले. आज पंत क्रिकेटच्या तीनही प्रकारात भारताकडून धमाल फलंदाजी करत आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटप्रेमींना वेड लावले आहे. एकेकाळी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणाऱ्या ऋषभची धोनीसोबत तुलना आज होत आहे.