यश हे तुम्ही प्रयत्न केले तर एक ना एक दिवस भेटतेच. फक्त तुम्ही हार न मानता प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत. आज अशा एका व्यक्तीची यशोगाथा बघूया ज्याने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत UPSC परीक्षेची तयारी केली आणि सहा वेळा अपयश आलं पण हार न मानता सातव्या प्रयत्नात तो IAS बनला. या अधिकाऱ्याचं नाव आहे के जयगणेश. घरच्या परिस्थितीमुळे गणेशला हॉटेलमध्ये काम करून शिक्षण घ्यावं लागलं.
हॉटेलमध्ये काम करूनही परीक्षेची तयारी केलेल्या गणेशने दाखवून दिलं आहे कि तुम्ही प्रयत्न केले आणि मनात जिद्द असेल तर एक दिवस यश मिळतंच. जयगणेश हे त्या लोकांसाठी प्रेरणादायी आहेत जे लोक थोडं काही संकट आलं तर आपल्या स्वप्नाचा पाठलाग सोडून देतात. जाणून घेऊया जयगणेशचा हॉटेलमध्ये प्लेट साफ करण्यापासून IAS अधिकारी बनण्यापर्यंतचा जीवनप्रवास..
तामिळनाडूच्या उत्तर अंबरमध्ये के जयगणेशचा जन्म झाला. जयगणेशचा जन्म नाजूक आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबात झाला. त्याच्या कुटुंबात आई वडील आणि ४ बहीण भाऊ होते. वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका खासगी कंपनीत जॉब करायचे. कुटुंब मोठं असल्याने त्यांचा सर्व पगार घरखर्चातच जायचा. अनेक अडचणी असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणात मात्र कसर ठेवली नाही.
जयगणेशच सुरुवातीचं शिक्षण गावातच झालं. शाळेत हुशार असलेल्या गणेशने चांगल्या मार्काने शाळेत यश मिळवलं. दहावी झाल्यानंतर त्याने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. दहावीत त्याने ९१ टक्के मार्क मिळवून स्वतःमधली चमक दाखवून दिली होती. गव्हर्नमेंट कॉलेजमधून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण झाल्यावर त्याला लगेच जॉब मिळाला. त्याला २५०० पगार मिळायचा. त्याच्या पगारात घरखर्च चालत नव्हता. त्याच्यावर घरच्या जबाबदाऱ्या होत्या तर दुसरीकडे त्याचे स्वप्न देखील होते. दोन्ही गोष्टी समजून घेऊन त्याने UPSC ची तयारी सुरु केली.
यूपीएससीची तयारी त्याच्यासाठी सोपी नव्हती. आर्थिक तंगी होती आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी गणेशला पैशांची गरज होती. त्याच्या शिक्षणासाठी देखील त्याला पैसे कमी पडू लागले. त्याच दरम्यान त्याची नोकरी देखील गेली. या संकटात त्याने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम सुरु केले. तो दिवसभर हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा तर रात्री आपल्या यूपीएससीचा अभ्यास करायचा.
त्याच्या परिस्थितीचा प्रभाव त्याच्या निकालावर देखील पडू लागला. त्याने खूप प्रयत्न करूनही त्याला यूपीएससी परीक्षेत अपयश येत होते. त्याला ६ वेळा UPSC परीक्षा देऊनही अपयश आलं. त्याच दरम्यान त्याला सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो मध्ये नोकरी मिळाली. त्याला मोठी नोकरी मिळूनही त्याने अभ्यास कमी किंवा बंद नाही केला. अपयशातून तो शिकत गेला आणि आपल्या चुकांवर काम केले.
जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्टा केलेल्या जयगणेशकडे आता यूपीएससी परीक्षेचा शेवटचा चान्स होता. त्याला सातव्या प्रयत्नानंतर पुन्हा परीक्षा देता येणार नव्हती. यावेळी नापास झाल्यास त्याचे IAS होण्याचे स्वप्न भंगणार होते. पण नशिबाने देखील यावेळी साथ दिली आणि त्याने आपल्या सातव्या आणि शेवटच्या परीक्षेत भारतात १४७ वि रँक मिळवत IAS पद मिळवले.
त्याचा निकाल लागल्यानंतर तो पास झालाय याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण पुन्हा पुन्हा निकाल बघितला आणि नंतरच घरच्यांना हि खुशखबर दिली. त्याच्या या यशामध्ये खूप मोठा त्याग आणि जिद्द आणि मेहनत होती. कुटुंबात देखील आनंदाला पारावर राहिले नाही. एक वेटर ते IAS अधिकारी या गणेशच्या प्रवासात त्याचा आत्मविश्वास देखील महत्वाचा होता.