शेतकऱ्यांच्या कुटुंबात तिचा जन्म झाला. घरी अठरा विश्वे दारिद्र्य. घरी बऱ्याच वेळा चहाला साखर नसायची तर कधी भाजीला तेल नसायचं. पण तिने निर्धार केला आणि शेतकरी आईवडिलांनी तिच्या स्वप्नांना बळ दिले. तिने मेहनत घेतली, खूप संघर्ष केला आणि पोलीस सेवेत दाखल होत आज देशसेवा करतेय. १०० रुपये रोजंदारीने एकवेळ लोकांच्या शेतात काम केलेल्या या शेतकऱ्याच्या मुलीचा जीवनप्रवास खुप प्रेरणादायी आहे.
या शेतकऱ्याच्या मुलीचे नाव आहे पल्लवी जाधव. पल्लवीचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल नावाचं एक छोट्याशा खेड्यागावातला. पल्लवीचे प्राथमिक शिक्षण देखील याच गावात झालं. पहिली ते पाचवी याच गावात शिक्षण घेतलं. पुढे शेजारच्या गावात आणि नंतर कन्नड मध्ये तिने शिक्षण घेतलं. कन्नडच्या महाविद्यालयातच पल्लवीने ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केले.
पल्लवी शिक्षण घेत होती तेव्हा तिच्या गावात मुलींना शिकवायला लोक नको म्हणायचे. मुलींचे लग्न देखील १५-१६ व्या वर्षीच केले जायचे. १० वि झालं मुलींचे लग्न केले जायचे. पल्लवीच्या २ बहिणींचे लग्न देखील १५-१६ व्या वर्षीच झाले. पण पल्लवीचे आई वडील आणि बहीण भाऊ मात्र तिला शिक्षणासाठी साथ देत असत. ती हुशार असल्याने तिला चान्स मिळाला.
पल्लवी १० वी पास झाल्यानंतर कॉलेजला जाणारी घरातली पहिलीच मुलगी होती. पल्लवीला ज्यावेळी ११ वीला ऍडमिशन घेतलं त्यावेळी तीच कॉलेज लांब होतं. घरच्या परिस्थितीमुळे रोज कॉलेजला जाणं शक्य नव्हतं. त्यावेळी पल्लवीने आई वडिलांना शेतात काम करण्यास मदत केली. हप्त्यातून एकच दिवस ती कॉलेजला जाऊ शकायची.
पुढे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण झाल्यावर पल्लवी घरीच होती. तिने एमए ला ऍडमिशन घेतले होते. ती २० वर्षांची झाली होती. पण गावाकडे मुलीचं २० वर्ष वय म्हणजे ते लोकांना ४० वर्ष वाटायचं. तिला सारखं लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते. हीच लग्न कधी हे शब्द खूपदा ऐकावे लागत होते. नातेवाईक, शेजारी, गावचे लोक देखील मुलगी मोठी झाली तीच लग्न करा असं म्हणायचे. मुली कितीही शिकल्या तरी त्यांना भांडेच घासायचे हे देखील ऐकावं लागत होतं.
आई वडिलांनी देखील हे ऐकून ऐकून मुलीचं लग्न करून टाकण्याचं ठरवलं. पण एका नातेवाईकाचं लग्न तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. आई आणि पल्लवी या दोघी लग्नाला गेल्या होत्या. तिथे आईचे नातेवाईक मोहन मोरे भेटले. आईने त्या बाबांना पल्लवीसाठी चांगला मुलगा बघा म्हणून सांगितलं. पण ते बाबा जेव्हा पल्लवीला भेटले तेव्हा त्यांनी तिच्यात असलेलं कौशल्य हेरलं आणि आईला पुढे शिकवण्यास सांगितले. त्यांनीच पल्लवीला एमपीएससी करायला सांगितले.
पल्लवी नंतर अभ्यासासाठी बाहेर पाठवायचं ठरलं खरं पण परिस्थिती मात्र नव्हती. आई वडिलांनी बचत गटाकडून ५ हजार रुपये कर्ज काढलं. पल्लवी औरंगाबादला आली. २ महिने ती खासगी होस्टेलला राहिली. त्यावेळी तिची दीड हजार रुपये महिना भाडं देण्याची ऐपत नव्हती. बाकी खर्च देखील होताच. त्यामुळे तिने औरंगाबाद विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं तिला फ्री हॉस्टेल मिळालं. त्यानंतर तिचे खूप मेहनत घेत तयारी केली.
पल्लवीने २०११-१२ मध्ये आईसोबत दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारीने देखील काम केलं आहे. त्यावेळी तिला फक्त १०० रुपये रोज मिळायचा. पल्लवीने युनिव्हर्सिटीमध्ये देखील कमवा आणि शिका योजनेत काम केले. यामध्ये तिला शेतीत काम, साफसफाई, वेगवेगळे गोष्टी बनवणे हे केले. तिला त्यासाठी ११०० रुपये महिना मिळायचा.
पल्लवीला पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते. २ मार्कानी ती मागे राहिली होती. ती त्यावेळी खूप रडली होती. पुढे २०१५ मध्ये पीएसआय साठी पल्लवीची निवड झाली. आता पाच वर्ष पोलिस दलात सेवाही बजावली आहे. PSI बनलेल्या पल्लवी जाधवला मॉडेलिंग आणि अभिनयाची देखील सुरुवातीपासूनच आवड होती. जालना शहरातील दामिनी पथकाच्या प्रमुख PSI पल्लवी जाधव या ग्लॅमऑन मिस इंडिया स्पर्धा २०२०च्या फस्ट रनर देखील ठरल्यात. त्यांचे सोशल मीडियावर नेहमी नवनवे फोटो बघायला मिळतात.
ख्वाडा, बबन या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या आगामी चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिकाही पल्लवी जाधव करताना दिसणार आहे. हैदराबाद कस्टडी या आगामी चित्रपटात त्या काम करत असून त्याचं या चित्रपटाचं अर्ध शूटिंग झालं आहे. कोरोनामुळे उरलेलं शूटिंग करण्यात अडथळे येत आहेत.