आजकाल राजकारणात एखादा नेता सरपंच, नगरसेवक जरी झाला तरी त्याचा असा थाट असतो कि बघायचं काम नाही. नगरसेवकांचा तर जरा जास्तच थाट असतो. आलिशान फॉर्च्युनर गाड्या, हातात २-३ महागडे फोन, आलिशान घर, ऑफिस आणि सोबत नेहमीच २-४ कार्यकर्त्यांचा गराडा. पण या सर्व गोष्टीला अपवाद आहे एक असा व्यक्ती जो १० वर्ष नागपूर महापालिकेत नगरसेवक राहीला. फक्त नगरसेवकच नाही तर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्याच्याकडे होत्या. ५ वर्ष हा व्यक्ती स्थायी समिती अध्यक्ष राहिला.
आज त्या व्यक्तीला त्याच्या प्रामाणिकपणामुळे नागपुरात जिथं ट्रस्टी ते होते तिथंच चौकीदार म्हणून काम करावं लागत आहे. हि व्यक्ती आहे नागपूरचे ७२ वर्षीय देवराम तिजोरे. देवराम हे असे राजकारणी आहेत जे पैशाच्या जोरावर चालणाऱ्या राजकारणाला अपवाद ठरले आहेत.
देवराम तिजोरे हे १० वर्ष नागपूर महापालिकेचे नगरसेवक होते. ५ वर्ष ते स्थायी समिती अध्यक्ष देखील राहिले. शिवाय नागपूर सुधार प्रन्यासचे एक वेळचे ट्रस्टी देखील ते होते. याच देवराम याना आज कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वॉचमन म्हणून नोकरी करावी लागत आहे. ज्या नागपूर सुधार प्रन्यासचे ते ट्रस्टी होते तिथेच ते आज वॉचमन म्हणून नोकरी करतात.
देवराम यांच्या आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे त्यांचा प्रामाणिकपणा आणि खऱ्या अर्थाने फक्त समाजासाठी, लोकांसाठी केलेले राजकारण. अनेक वर्ष सत्तेत असताना देखील देवराम यांनी स्वतःसाठी काहीच कमावलं नाही. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात फक्त लोकांचीच सेवा केली. राजकारण हे स्वतःच्या स्वार्थासाठी नसल्याचे देवराम सांगतात.
देवराम यांनी प्रामाणिकपणे राजकारण केले ज्यामुळे त्यांनी एक दमडीही कमावली नाही. खरं बघायला गेलं तर स्थायी समितीचा अध्यक्ष राहिलेला व्यक्ती हा आज करोडपती असला असता. पण त्या कमाईला आडवा आला देवराम यांचा प्रामाणिकपणा.
आजकाल आपण असे अनेक नेते नगरसेवक बघू शकतो जे एकदा पद मिळालं कि आपलं घर भरायला सुरु करतात. पदावर राहून स्वतः गडगंज संपत्ती जमा करतात. नंतर राजकारणात यश मिळो अथवा न मिळो ते आयुष्य एकदम आलिशान जगतात. पण देवरामांना मात्र हे कधी पटलंच नाही.
देवराम तिजोरे आज आपल्या २ खोल्याच्या घरात राहतात. या घरामध्ये मोडकळीस आलेले फर्निचर आहे. त्यांच्याकडे एक नादुरुस्त असलेली एक मोपेड गाडी आहे. एवढीच त्यांची आज संपत्ती आहे. त्यांनी घर देखील कर्ज काढून बांधलेला असून पैशांअभावी त्याला रंगरंगोटी देखील नाहीये.
एकेकाळी शरद पवार, दत्ता मेघे, सतीश चतुर्वेदी, श्रीकांत जिचकर या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांसोबत काम करणारे, राजकीय मंच गाजवणारे देवराम आज मात्र चौकीदार आहेत. आणि त्यांना त्यांच्या आजच्या परिस्थितीवर खंत देखील नाहीये. स्वतःच्या आयुष्याची उमेदीचे वर्षे आपल्या पक्षासाठी आणि नागपूरच्या जनतेसाठी खर्ची घातली. मात्र, एकेकाळचा हा प्रामाणिक राजकारणी आज उतार वयात चौकीदार म्हणून नोकरी करण्यास मजबूर आहे.