१२ ऑक्टोबर १९९८ रोजी दिवस उजाडला. नवी दिल्लीतील ९ शामनाथ मार्ग येथे मुख्यमंत्री यांच्या घराबाहेर शेतकऱ्यांनी गर्दी केलेली. रोडला एक सरकारी बस उभी. शेतकरी घोषणाबाजी करत होते. या गर्दीतून एक धोतर आणि कमीज घातलेला व्यक्ती निघतो. आपलं सामान घेऊन बसमध्ये जाऊन बसतो. आणि शालिमार बागेकडे आपल्या घराकडे निघून जातो. तो व्यक्ती होता दिल्लीचा मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा.
दिल्ली हरियाणा सीमेवर मुंडका या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले साहिब सिंह एएमयू मध्ये लायब्ररी सायन्सचे शिक्षण घेतले. तिथून डिग्री घेऊन दिल्लीच्या महापालिकेच्या लायब्ररी मध्ये नोकरी मिळवली. त्यावेळी तिथे जनसंघाचा दबदबा होता. संघाशी साहिब सिंह जोडले गेले. मोरारजीचं सरकार असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नगरसेवक बनले. ८० च्या दशकात पुन्हा विजय मिळवला आणि भाजपमध्ये वजन वाढलं.
१९९१ मध्ये दिल्ली लोकसभेचे तिकीट मिळालं. सज्जन कुमार यांचं मोठं आव्हान समोर होतं. सज्जन यांनी मोठा पराभव केला. पण हार नाही मानली. दिल्लीच्या ग्रामीण भागात या निवडणुकीने वेगळी ओळख मिळवून दिली. १९९३ मध्ये दिल्लीच्या पहिल्या विधानसभेत शालिमार बाग येथून आमदार म्हणून निवडून गेले. त्यावेळी भाजपचं सरकार दिल्लीत आलं. मदन लाल खुराणा मुख्यमंत्री बनले. साहिब सिंह याना २ नंबरच मंत्री पद मिळालं. ते शिक्षण मंत्री झाले.
मदन लाल खुराणा आणि त्यांच्यात जास्त पटत नसे. पुढे १९९६ मध्ये ते मुख्यमंत्री बनले. शिवाय वाजपेयी सरकार मध्ये केंद्रीय मंत्रिपद देखील त्यांना मिळालं. लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत २लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. त्यांचे शैक्षणिक दुनियेत मोठं नाव झालं.
साहिब सिंह यांचा परिस्थितीमुळे १९५४ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षीच विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचं नाव साहिब कौर आहे. एका जाट परिवारात जन्मलेल्या साहिब याना कॉलेजमध्ये असणाऱ्या जाट समुदायाच्या विरोधामुळे वर्मा हे नाव लावावे लागले होते.
अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या साहिब सिंह यांना आपल्या एका वक्तव्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. साहिब सिंह याना पत्रकारांनी महागलेल्या कांद्याविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर गरीब व्यक्ती कधीच कांदा खाऊ शकत नाही असे ते म्हणाले होते. यावर खूप टीका झाली. आंदोलन झाले. निवडणूक आल्या होत्या. हा मुद्दा भोवणार हे लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या २ महिने आधी राजीनामा दिला.
पण दिल्ली सारख्या राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या या नेत्याचा साधेपणा तेव्हा दिसून आला होता. दिल्लीचा मुख्यमंत्री असलेला व्यक्ती हा एका सरकारी बसने घरी गेला. त्याने एवढं मोठं पद असूनही काही चुकीचं करून स्वतःच घर भरलं नाही किंवा काही भ्रष्टाचार केला नाही. देशाला अशाच नेत्यांची खरी गरज आहे. साहिब सिंह यांचं २००७ मध्ये रस्ते अपघातात निधन झालं.