Friday , January 27 2023
Breaking News
Home / क्रीडा / वर्ल्डकप फायनलची तिकिटे दिली नाहीत म्हणून पठ्ठ्याने पुढची वर्ल्डकप स्पर्धाच भारतात आणली होती

वर्ल्डकप फायनलची तिकिटे दिली नाहीत म्हणून पठ्ठ्याने पुढची वर्ल्डकप स्पर्धाच भारतात आणली होती

२०२४ ते २०३१ या कालखंडात क्रिकेटमधील दोन वनडे वर्ल्डकप आणि चार टी-२० वर्ल्डकप खेळवले जाणार आहेत. जगभरातील १७ देशांनी या स्पर्धांच्या आयोजनासाठी इच्छा व्यक्त केली आहे. १९८३ सालच्या क्रिकेट वर्ल्डकपनंतर राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने जर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना आव्हान दिले नसते, तर कदाचित आज जगातल्या कुठल्याच देशाने आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धांचे आयोजन करण्याची मागणी करण्याची हिंमत केली नसती.

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवल्या गेल्या. या स्पर्धेत भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात अंतिम सामना होणार होता. आपण ज्यांच्यावर इतकी वर्षे राज्य केले, तेच देश आपल्या नाकावर टिच्चून वर्ल्डकप फायनल खेळात आहेत, हे पाहून इंग्लंडची आधीच जळाली होती. फायनल पाहण्यासाठी भारतातून अनेक लोक इंग्लंडला गेले होते. त्यात तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नरेंद्र साळवे हे देखील होते. ते त्यावेळी बीसीसीआयचे चेअरमन, आयसीसीचे सदस्यदेखील होते.

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताचा संघ असल्यामुळे त्या सामन्यासाठी तिकीट मिळण्याबाबत बीसीसीआयच्या इतर सदस्यांनी साळवेंकडे वशिला लावला. साळवेंना आशा होती की इंग्लंड क्रिकेट बोर्ड आपल्याला अतिरिक्त तिकिटे देईल, पण तसे झाले नाही. त्यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे तिकिटे मागितली, पण त्यांना नकार दिला गेला. नाईलाजाने साळवेंना गप्प बसून फायनल सामना पहावा लागला, पण त्यांच्या मनात वेगळेच काहीतरी चालू होते. अचानक साळवेंना एक कल्पना सुचली.

भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर साळवेंच्या मेव्हण्याने एक पार्टी ठेवली, त्यात भारतीय संघ, बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले. जेवणाच्या टेबलवर साळवे उद्गारले, “भारत आणि पाकिस्तान यांनी मिळून पुढच्या वर्ल्डकपचं आयोजन केलं तर..?” त्यावेळी आयसीसीने केवळ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियालाच वर्ल्डकप भरवण्याचे अधिकार दिले होते, त्यामुळे साळवेंच्या प्रश्नावर बाकीचे गप्प बसले. पण साळवेंनी हार मानली नाही.

त्यावेळी आयसीसीचे २८ सदस्य देश होते, त्यापैकी केवळ ७ देश टेस्ट क्रिकेट खेळायचे. उरलेल्या २१ देशांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी साळवेंनी एक योजना आखली. टेस्ट खेळणाऱ्या संघांना इंग्लंडच्या चौपट आणि टेस्ट न खेळणाऱ्या देशांना इंग्लंडच्या पाचपट रक्कम देण्याचे घोषित केले. बीसीसीआयकडे इतका पैसा कुठून आला म्हणून आयसीसी देखील चिंतेत पडली.

त्यावेळी धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्सने स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपच्या बदल्यात बीसीसीआयला सहकार्य केले. त्यानंतर स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयने प्रस्ताव ठेवला. १६-१२ मतांनी बीसीसीआयने हा प्रस्ताव जिंकला आणि १९८७ चा वर्ल्डकप भारतात झाला. या वर्ल्डकपचे आयोजन इतके यशस्वीरीत्या झाले की त्यानंतर जगातील सर्व देशांना वर्ल्डकपच्या आयोजनाचा दावा करणे सुकर झाले.

About Mamun

Check Also

सतपाल नावाच्या वादळाला चारीमुंड्या चीत करुन बिराजदार मामांनी महाराष्ट्राची लाज राखली

लातूरच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावी ५ जून १९५० रोजी रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *