अनेकदा आयुष्यात काही करायचं ठरवलं तर ते साध्य होतंच असं नाही. कारण तुमचे प्रयत्न पण तितकेच महत्वाचे असतात. तुम्हाला आयुष्यात काय बनायचं हे एकदा मनाशी ठरवलं तर तुम्ही त्यासाठी स्वतःला झोकून द्या. तुमचे पूर्ण लक्ष त्याकडे केंद्रित करा आणि मग बघा यश मिळतं का नाही. आज तुमच्यासाठी अशीच एक प्रेरणादायी कहाणी घेऊन आलो आहोत जी वाचून तुम्हाला देखील वाटेल कि आयुष्यात यश मिळवणं आपल्याच हातात आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात राहणाऱ्या सुरेंद्र आणि सारिका खिसमतराव यांना एक मुलगा झाला. सुरेंद्र यांचं कुटुंब एक सर्वसामान्य कुटुंब होतं. मुलाचं नाव अलोक खिसमतराव. आलोक लहानपणीपासून शाळेत अभ्यासात हुशार होता. पण खेळायचा आणि मस्तीचा खूप नाद त्याला होता. हुशार असलेला अलोक तेवढाच डॅम्बीस देखील होता. हळू हळू वय वाढत गेलं.
अलोकला ठाण्यातील परसराम रामनारायण विद्यालयात शाळेत टाकलं. अलोक दहावीपर्यंत येथेच शिकला. तो चांगले मार्क घेऊन दहावी पास झाला. पुढे चांगल्या मार्काने पास झालेल्या अलोकल घरच्यांनी सायन्सला बीएनएन कॉलेजला घातलं. त्यावेळी परिस्थिती साधारण असल्याने या कॉलेजला प्रवेश घ्यावा लागला. अलोकचे मित्र मात्र मोठमोठ्या कॉलेजमध्ये गेले होते. त्यामुळे त्याचे कॉलेजमध्ये मन रमेनाशे झाले.
टाईमपास करण्यातच ११ वि अन १२ वि गेली. त्यामुळे अभ्यास देखील जास्त केला नाही. याचा परिणाम निकालात दिसला आणि तो बारावीत नापास झाला. दहावीपर्यंत टॉपर असणारा अलोक बारावीत नापास झाल्याने आईवडिलांना धक्का बसला. नातेवाईक फोन करून नाव ठेवायला लागली. त्रास सहन करावा लागला. पुन्हा बारावीची तयारी केली आणि पुन्हा परीक्षा दिली. पण त्यातही अपयश आलं आणि तो पुन्हा नापास झाला.
अलोकचं नशीबच साथ देत नसावं. एका हुशार मुलाला २ वेळा बारावीत अपयश आलं. त्याची एवढी वेळ खराब होती कि तिसऱ्यांदा बारावी द्यायचं ठरवलं तर सिलॅबसच बदलला. त्यामुळे आता बारावी पास होणे अधीकच कठीण होते. पण त्याने पुन्हा मन लावून अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात ५५ टक्के घेऊन बारावी पास झाला.
पास तर झाला खरा पण या ३ वर्षात अलोक खचून गेला होता. त्याची शिक्षणाची आवड कमी झाली. मन लागत नव्हतं. मग नोकरी करण्याचं ठरवलं. पहिला जॉब म्हणजे तो मोबाईल शॉपी मध्ये कामाला लागला. पुढे चालून झेरॉक्स च्या दुकानातही काम केलं. घरचे मात्र पुढच शिक्षण घे म्हणून मागे लागले होते. पण अलोकची इच्छा नव्हती. त्याने घरच्यांच्या आग्रहामुळे मुक्त विद्यापीठातून बीए केलं. पुढे शिक्षणावर काही चांगली नोकरी मिळाली नाही. मग टेक्सटाईल कंपनीत देखील काम केलं. एका जिम मध्ये ट्रेनर म्हणून देखील काम केलं.
पुढे नोकरीत देखील मन रमलं नाही. व्याजाने पैसे काढून दुकान टाकण्याचं ठरवलं. पण त्यातही मेळ बसला नाही. दुकानाला ३ महिन्यात कुलूप लागलं. आईवडील आणि बहिणीने मात्र साथ दिली. एका पेपरमध्ये पाहिलेली जाहिरात हा अलोकच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याने स्पर्धा परीक्षेत टॉपर आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो पाहिले. आपलाही फोटो पेपरमध्ये आला पाहिजे असा मनात विचार केला आणि स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरलं. पुण्याला जायचा निर्णय घेतला.
पुण्यात आल्यावर मन लावून अभ्यास सुरु केला. युनिक अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. छोट्याशा रूममध्ये राहून अभ्यास सुरु केला. सोशल मीडियापासून दूर गेला. अखेर २०१७ मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा पास करून अलोकने PSI होण्याकडे पहिले पाऊल टाकले. आता फिजिकल देऊन तो PSI होणार होता. पण नवीन संकट आलं. मैदानात सराव करताना तो जखमी झाला. साधं चालता पण येत नव्हतं. पण अखेर ४ महिन्यांनी तो बरा झाला. पुन्हा प्रॅक्टिस केली आणि ग्राउंड परीक्षेत त्याने १०० पैकी १०० मार्क घेण्याचा पराक्रम केला. PSI परीक्षेत ग्राऊंडमध्ये १०० पैकी १०० घेणारा तो पहिलाच ठरला होता. एकेकाळी मोबाईल शॉपीमध्ये काम करणारा अलोक ८ मार्च २०१७ रोजी PSI झाला ते हि परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात.