Sunday , May 28 2023
Breaking News
Home / क्रीडा / ४ वर्षाचा असताना आई गेली, वडिलांनी कपड्याचं दुकान बंद करून त्याला क्रिकेटर बनवलं!

४ वर्षाचा असताना आई गेली, वडिलांनी कपड्याचं दुकान बंद करून त्याला क्रिकेटर बनवलं!

आयपीएलचं चौदावं सीजन नुकतंच सुरु झालं आहे. या सिजनमध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला तर दुसरा सामना काल दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या संघात झाला. या सामन्यात नवखा कर्णधार रिषभ पंतच्या दिल्ली संघाने चेन्नईचा सहज पराभव केला. या सामन्याचा हिरो ठरला दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ.

पृथ्वी शॉ हा मागील आयपीएल सिजनपासून फॉर्म मध्ये नव्हता. पण नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने धावांचा डोंगर करत मुंबई संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. मुंबईत जन्मलेला आणि मूळचा बिहारचा असलेला पृथ्वी शॉ च्या क्रिकेटर बनण्यामध्ये त्याच्या कुटुंबाचा मोठा संघर्ष आहे. जाणून घेऊया त्याचा जीवनप्रवास.

पृथ्वी पंकज शॉ चा जन्म ९ नोव्हेंबर १९९९ रोजी मुंबईमधील विरार मध्ये झाला. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पृथ्वीला आईचे प्रेम जास्त काळ लाभले नाही. तो ४ वर्षाचा असतानाच आईचं निधन झालं. पृथ्वीचे वडील पंकज शॉ हे मूळचे बिहारमधील गया जिल्ह्यातील मानपूर गावचे रहिवाशी आहेत. मुंबईत ते कामाच्या निमित्ताने आले आणि इथेच स्थायिक झाले. त्यांचा कपड्याचं दुकान होतं. पण पृथ्वीच्या आईच्या निधनानंतर त्यांनी ते बंद केलं. कारण पृथ्वीकडे लक्ष द्यायचं होतं. त्याच्या करिअरसाठी त्यांनी आपला धंदा बंद केला. पृथ्वीचे आजोबा आजी अशोक आणि रामदुलारी हे आजही बिहार मध्ये कपड्याचा छोटं दुकान चालवतात.

वडिलांसोबत प्रॅक्टिसला जाताना पृथ्वी

पृथ्वी लहान असतानाच वडिलांनी त्याला क्रिकेट अकॅडमी मध्ये टाकलं. परिस्थिती नसल्याने क्रिकेटचे धडे घेण्यास अडचणी येत होत्या. पण एका एंटरटेनमेंट कंपनीने त्याला आर्थिक मदत केली. विविध देशांमध्ये विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. क्रिकेटची खूप जोरदार तयारी सुरूच होती. पृथ्वी सर्वप्रथम चर्चेत आला २०१३ मध्ये जेव्हा त्याने शालेय क्रिकेटमध्ये धावांचे डोंगर उभारले. त्याने एका सामन्यात तर ३३० चेंडूत ५४६ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर त्याची विजय मर्चेंट चषकासाठी अंडर १६ संघात निवड झाली.

पृथ्वी लहान असताना त्याचे वडील मित्रांसोबत घेऊन जेडब्लू हॉटेलच्या जवळ प्रॅक्टिस साठी घेऊन जायचे. तिथं बीचवर पृथ्वीने प्रॅक्टिस केली. तेव्हा तो फक्त ११ वर्षांचा होता. वडील त्याला गोलंदाजी करत असत. एका कंपनीमुळेच ते विरारमधून मुंबईत राहायला जाऊ शकले. पृथ्वीची सर्वप्रथम मुंबईच्या रणजी संघात निवड २०१७ मध्ये झाली.

त्याने तामिळनाडू विरुद्ध पहिला सामना खेळला. पहिल्याच सामन्यात दुसऱ्या पारीत त्यानं शतक झळकावून मुंबईला विजय मिळवून दिला. त्याने हे शतक करत सचिनचा रेकॉर्ड मोडला. तो पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. पहिल्याच सामन्यात त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळाला.

पुढे विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील पृथ्वीने चांगली कामगिरी केली. याच कामगिरीचं बक्षीस म्हणून भारताच्या अंडर १९ संघात विश्वचषकासाठी स्थान मिळालं. अंडर १९ संघाचं कर्णधारपद देखील मिळालं. त्याच्या नेतृत्वात भारताने २०१८ मध्ये अंडर १९ विश्वचषक देखील जिंकला. त्याने फायनलमध्ये देखील शतक झळकावलं होतं. २०१८ मध्ये पृथ्वीला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने १.२ कोटी रुपयात खरेदी केले. प्रदर्शनाच्या बळावर त्याची वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघात निवड झाली. थोड्याच कालावधीत त्याची सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि वीरेंद्र सेहवागसोबत तुलना होऊ लागली.

पृथ्वी शॉला शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी खूप मदत केली आहे. त्याला विरारवरून येऊन मुंबईत प्रॅक्टिस करणे कठीण होत असे. मुंबईत घर घ्यायची परिस्थिती नव्हती. तेव्हा पोतनीस यांनी वकोला च्या एसआरए कॉलनी मध्ये त्याला घर दिलं होतं. पोतनीस यांनी फडणवीस याना भेटून देखील पृथ्वीला घर मिळावं म्हणून २०१८ मध्ये प्रयत्न केले होते. तर उद्धव ठाकरेंनी देखील पृथ्वीला घराची चिंता सोड असे आश्वासन दिले होते.

१८ व्या वर्षीच भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या पृथ्वीने पहिल्याच टेस्टमध्ये रेकॉर्ड बनवला. वेस्ट इंडिजविरुद्ध डेब्यू मध्ये त्याने शतक झळकावलं. १३४ धावांची खेळी करून त्याने आपली छाप सोडली. पुढे त्याला वनडे संघात देखील स्थान मिळाले. पण खराब फॉर्ममुळे तो भारताच्या संघाबाहेर गेला. पण हार मानेल तो पृथ्वी शॉ कसला. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पाडला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात ३८ चेंडूत ७८ धावांची खेळी करून त्याने भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा ठोठावले आहेत.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *