आयुष्य हे संकटांनी भरलेलं असतं. फक्त त्या संकटाना तोंड देऊन त्यावर मात करण्याची धमक आपल्यात असायला हवी. आयुष्यात जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट आयुष्यात कठीण नसते. यशाला गवसणी घालण्यासाठी याच गोष्टी आवश्यक असतात. आज अशा एका रणरागिणीची गोष्ट बघणार आहोत जिच्या आयुष्यात संकटांनी तिला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण तिने सर्व संकटांचा सामना करत आयुष्यात मोठ्या यशाला गवसणी घातली. सोलापूर जिल्ह्यातील हि महिला आज लाखोंच्या व्यवसायाची मालकीण आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी उपळाईच्या स्वाती ठोंगे. माहेरचं ५२ लोकांचं मोठं कुटुंब. स्वाती खूप लाडात वाढली. वडिलांना बहीण नव्हती त्यामुळे ते स्वातीचा खूप लाड करत असत. स्वाती शाळेत जायला लागली. दहावीपर्यंत शिक्षण झालं. पण कुटुंबातील लोकांचं मत होतं कि मुलींना शिकवू नये. स्वातीचं शिक्षण बंद झालं. शिकून व्यावसायिक व्हायचं हे तीच स्वप्न अधुरं राहील असं वाटत होतं.
२००६ मध्ये वडिलांनी स्वातीचं लग्न लावून दिलं. पण ४ वर्षातच सुखी संसाराला नजर लागली आणि तिच्या पतीचं निधन झालं. त्यावेळी मुलगी अवघ्या साडे तीन महिन्याची तर मुलगा पावणे २ वर्षांचा होता. माहेरचं मोठं कुटुंब असल्याने सासरला तसं कुटुंब असावं असं तिला वाटायचं पण सासरला काळाने घाला घातला. पती लवकरच गेले. कुटुंबातील इतर सदस्यांचा पाठिंबा तिला मिळायला हवा होता पण तो मिळाला नाही. सासरच्यांनी तुझं आणि मुलांचं काय करायचं तर बघ असं म्हणून तिच्यापासून हात मागे घेत मदत करण्यास नकार दिला.
वडिलांनी माहेरला ये म्हणून सांगितलं. पण स्वातीने नकार दिला. तिने पुन्हा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असे ठरवले. स्वाती रोज रात्री रडायची. रडून काही होणार नाही हे तिने ओळखलं. मुलांसाठी देखील काही करावे लागेल हे तिला माहिती होतं. स्वातीला एक धक्कादायक अनुभव कुटुंबातील सदस्यांकडून आला होता. स्वातीच्या मुलाने चुलत्याला ५ रुपये मागिलते होते. चुलत्याने त्या ५ रुपयांसाठी वेळोवेळी त्यांचा अपमान केला.
स्वातीला परिस्थितीचं भान होतं. ५ रुपयांसाठी एवढं असेल तर भविष्यात किती अडचणी येणार हे तिने ओळखलं. स्वातीला मावस बहिणीने बचत मंडळात जाऊन काम करण्याचा सल्ला दिला. कुटुंबाचा विरोध होता. कुटुंबाने सांगितलं कि बचत गटात जायचं असेल तर आमच्यापासून दूर राहा. स्वातीने देखील धाडशी निर्णय घेत मुलांसाठी पुन्हा कोणासमोर हाथ पसरावायचं काम पडू नये असं ठरवलं. बचत गटात जायचं ठरलं.
बचत गटात काम सुरु केल्यावर त्यांचं काम बघून मार्केटिंगची जबाबदारी मिळाली. इथे काम करताना स्वातीची स्वतःच्या व्यवसायाची इच्छा अजूनही मनात होती. स्वातीला सोलापुरात कृषी स्टॉल मध्ये स्वतःचा स्टॉल लावायचा होता. त्यासाठी तिच्याकडे पैसे देखील नव्हते. आई वडिलांनी मदत देऊ केली. पण तिने ती मदत सवय लागेल म्हणून नाकारली. अखेर तिने मॅडमकडून २ हजार रुपये उसने घेऊन चहाचा स्टॉल लावला. या २ हजाराचे तिने ७ हजार रुपये कमावले. पहिल्याच व्यवसायात ५ हजार रुपयांचा नफा झाला.
पुढे बचत गटातून मुंबईला पाठवण्यात आले. बार्शीतल्या ६ बचत गटांच्या स्वाती मार्गदर्शक म्हणून गेल्या. ज्या महिला मुंबईला येऊ शकत नाहीत त्यांच्या वस्तू स्वाती यांनी खरेदी केल्या. त्या घ्यायला पैसे नसल्याने उधार घेतल्या. महिलांकडून ६० हजाराचा माल त्यांनी उधार घेतला. महिलांना मुंबईवरून आल्यावर पैसे देते असं सांगितलं. मुंबईत हा माल स्वातीने १ लाख २० हजारात विकला. यातून स्वातीने पुन्हा आपल्या अंगात असलेली चुणूक दाखवून दिली.
स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आता शांत बसू देत नव्हती. मॅडमकडे तशी इच्छा व्यक्त केली. उडीद आणि शाबू पापडाचा व्यवसाय स्वातीला करायचा होता. फिरून मार्केट कळलं होतं. त्यामुळे लोकांना काय हवं हे नीट माहिती होतं. व्यवसाय नेहमीच फायद्यात राहणार हे देखील त्यामुळे कळलं. ठरलं आणि मग २ महिलांना सोबत घेऊन उडीद आणि शाबू पापडांचा व्यवसाय सुरु केला.स्वातीनेच पापड कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिलं.
स्वाती यांचा गट पुढे केरळला गेला. तिथे विविध राज्यातील स्टॉल लागले होते. स्वाती आणि सोबतच्या ५ महिलांनी पुरणपोळीचा स्टॉल लावला. २ दिवस कोणीच फिरकलं नाही. स्वातीने अंदाज घेतला तेव्हा लक्षात आलं कि लोकांचा कल नॉन व्हेजकडे आहे. त्यांनी कोल्हापुरी रस्सा आणि मटण स्टॉल सुरू केला. ८ दिवसात १ लाख ६० हजारांची कमाई झाली. स्वाती यांनी केरळहून आल्यावर मैत्रीण रोहिणीला सोबत घेऊन स्वदेशी मार्केटिंग कंपनी सुरु केली.
स्वदेशी मार्केटिंग कंपनी फक्त बचत गटातील महिलांच्या वस्तू खरेदी करते. हे पदार्थ, वस्तू बार्शी, सोलापूर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी पाठवले जातात. स्वाती यांच्या मार्फत सध्या अनेक महिला आज घरी बसून महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमवत आहेत. महिलांनी जर ठरवलं तर त्या स्वत: व्यवसाय करुन खूप पैसा कमावू शकतात असं त्या सांगतात. एकेकाळी २००० हजार रुपये उधार घेऊन आपला पहिला व्यवसाय सुरु कऱणाऱ्या स्वाती आज महिन्याला ५० हजाराहून जास्त पैसे कमावत आहेत. शिवाय त्यांच्या संपूर्ण व्यवसायाची वार्षिक उलाढाल लाखोंमध्ये आहे.