२००९ मध्ये आलेला ३ इडियट चित्रपट सर्वानीच अनेक वेळा बघितला असेल. या सिनेमातली आमीर खान याने साकारलेली ‘रँचो’ची व्यक्तीरेखा खऱ्या जीवनात सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे. मोठ्या समस्यांवर अगदी सोप्या पद्धतीने उपाय शोधून काढणे हे रँचोचे आवडते काम. अगदी याच पद्धतीने खऱ्या आयुष्यात रँचो होता यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल शेख इब्राहिम उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर शेख इब्राहिम.
मुन्ना घर चालवण्यासाठी वेल्डिंगच्या दुकानात काम करायचा. मुन्नाच्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. तो पत्रकारागिर देखील होता. घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो अलमारी कुलर असे विविध उपकरणे बनवायचा. मुन्नाचे अवघे ८ वि पर्यंत शिक्षण झालेले होते. त्याला एक भाऊ आणि एक बहीण आहे. मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर आहे. एक दिवस मुन्नाच्या डोक्यात एक खूप मोठे स्वप्न आले. ते स्वप्न होते हेलिकॉप्टर बनवण्याचे. हेलिकॉप्टर बनवणे हे काही सोपे काम नव्हते. त्याने त्यासाठी काम चालू केलं. दिवसभर वेगवेगळे काम करणारा मुन्ना रात्री हेलिकॉप्टर साठी वेळ द्यायचा.
त्याने प्रयत्न सुरु केले. हळू हळू एक एक पार्ट तयार करत गेला. मुन्नाचे स्वप्न होते कि भारतीय बनावटीचे हेलिकॉप्टर बनवून ते देशवासियांसाठी स्वस्तात उपलब्ध करून द्यावे. तो खूप वेगाने आपल्या स्वप्नाच्या वाटेवर प्रवास करत होता. मुन्ना सिंगल सीटर हेलिकॉप्टर बनवू इच्छित होता. त्याला हे हेलिकॉप्टर शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी किंवा मग पूरग्रस्तांना मदत आणि औषधी पोहचवण्यासाठी किंवा मग रुग्णांना एअरलिफ्ट करण्यासाठी बनवायचं होतं. त्याच हे स्वप्न तो नेहमी बोलून दाखवायचा.
त्याने आपल्या हेलिकॉप्टरला मुन्ना हेलिकॉप्टर असे नाव दिले होते. सोबतच त्याच्यावर मोठे मेक इन इंडिया हे देखील स्टिकर त्याने लावलेले होते. मुन्नाने आपल्या हेलिकॉप्टर मध्ये मारुती ८०० गाडीचे इंजिन वापरले होते. सोबतच त्याने यासाठी चेन्नईच्या काही या क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींची मदत देखील घेतली होती. मुन्नाचे हे स्वप्न आता अंतिम टप्प्यात आले होते. तो वेगवेगळ्या ट्रायल सध्या घेत होता. मुन्नाला आपले हे हेलिकॉप्टर १५ ऑगस्ट रोजी लाँच करायचे होते. त्यामुळे तो काल हेलिकॉप्टरची ट्रायल घेत होता.
पण हि शेवटची ट्रायल त्याच्या आयुष्यात काळ बनून आली. ज्या स्वप्नासाठी रात्र दिवस एक करत मेहनत घेतली त्याच हेलिकॉप्टरने काळ बनून मुन्नाचा जीव घेतला. १० ऑगस्टच्या रात्री हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास त्याने सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले इंजिन 750 एम्पियर वर फिरत होते सर्व व्यवस्थित सुरू होते पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला. त्यानंतर तो फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले आणि डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईलचा जागीच मृत्यू झाला.
अवघ्या २-३ लाखात त्याने हे हेलिकॉप्टर बनवले होते. १५ ऑगस्टला हेलिकॉप्टरची पेटंट तयार करण्याची तयारी त्याने केली होती. पण नियतीला हे मान्य नव्हते. गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोहचवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या रँचोच्या अशाप्रकारे मृत्यूने गावासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुन्नाचे स्वप्न होते की, समाजातील गरीब लोकांसाठी काही तरी वेगळं करावं. त्यासाठी त्याचे प्रयत्न ही सुरू होते. त्याने हेलिकॉप्टर तयार करून जवळपास हे स्वप्न पूर्णच केले होते पण शेवटी मात्र मुन्ना अपघाताने जगाचा निरोप घेऊन गेला.