देशात क्रिकेट प्रेमाबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत प्रचंड क्रिकेट प्रेम भारतात बघायला मिळतं. आता २ दिवसात आयपीएल या जगप्रसिद्ध स्पर्धेला देखील सुरुवात होणार आहे. आयपीएल मध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो. तर BCCI कमाई देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या स्पर्धेतून करते. भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानलं जातं. क्रिकेट विश्वावर मागील काही वर्षात भारताने दबदबा तयार केला आहे.
आयपीएलच्या लिलावावेळी तुम्ही बघितलं असेल कि किती मोठ्या प्रमाणात बोल्या लावून खेळाडू विकत घेतले जातात. अगदी एका सिजनमध्ये २ महिने क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना करोडो रुपये मिळतात. अगदी १५-२० कोटी रुपये घेणारे खेळाडू देखील आयपीएलमध्ये आहेत. जर २ महिने क्रिकेट खेळण्यासाठी एवढे पैसे मिळतात मग देशाकडून क्रिकेट खेळताना किती पैसे मिळत असतील असा देखील प्रश्न तुम्हाला कधीतरी पडलाच असेल. तर जाणून घेऊया BCCI महिला आणि पुरुष क्रिकेटरला किती वार्षिक पगार देते..
भारतात क्रिकेट हा एक धर्मच बनला आहे. तर क्रिकेटपटूंची देवासारखी पूजा होते. भारताकडून क्रिकेट खेळण्याचे करोडोंचे स्वप्न असते. क्रिकेटपटूला पैसे आणि आलिशान आयुष्य जगायला मिळतं. BCCI आपल्या पुरुष खेळाडूंना आणि महिला खेळाडूंना खूप मोठा वार्षिक पगार देते. पण पुरुष क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या पगारात आणि महिला क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या पगारात जमीन आसमानचा फरक आहे. BCCI खेळाडूंना पगार हा ग्रेडनुसार देते. यामध्ये वार्षिक पगार वेगळा आणि मॅच फी वेगळी असते. तर प्रदर्शनानुसार मिळणारे बक्षीस देखील वेगळे असतात.
BCCI ने पुरुष संघातील खेळाडूंचे चार ग्रेड ठरवलेले आहेत. यामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी चा समावेश आहे. ए प्लस ग्रेडमध्ये असणाऱ्या खेळाडूंना BCCI ७ कोटी रुपये वार्षिक पगार देते. तर ग्रेड ए मधील खेळाडूंना वार्षिक ५ कोटी रुपये, ग्रेड बी मधील खेळाडूंना वार्षिक ३ कोटी रुपये आणि ग्रेड सी मधील खेळाडूंना वार्षिक १ कोटी रुपये पगार मिळतात.
सध्या भारताचे कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे ३ खेळाडू ग्रेड ए प्लस मध्ये आहेत. ग्रेड ए मध्ये रविचंद्रन अश्विन, रवीन्द्र जडेजा, भुवनेशर कुमार, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत चा समावेश आहे. ग्रेड बी मध्ये ऋद्धिमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवाल आहेत. ग्रेड सी मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकुर, श्रेयश अय्यर आणि वाशिंगटन सुंदर यांचा समावेश आहे.
महिला खेळाडूंना देखील ग्रेडनुसार पगार दिला जातो. यामध्ये ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी हे ३ प्रकार आहेत. पण पुरुष संघाच्या तुलनेत महिलांना अत्यंत कमी पगार दिला जातो. ग्रेड ए मध्ये असणाऱ्या महिला खेळाडूंना वार्षिक ५० लाख मिळतात. ग्रेड ए मध्ये मिताली राज आणि स्मृती मांधना चा समावेश आहे. ग्रेड बी मधील महिला क्रिकेटपटूंना ३० लाख आणि ग्रेड सी मधील क्रिकेटपटूंना १० लाख वार्षिक पगार मिळतो.
क्रिकेटपटूंना या वार्षिक पगाराशिवाय मॅच फी देखील मिळते. एक टेस्ट मॅच खेळण्यासाठी १५ लाख रुपये, एक वनडे खेळण्यासाठी ६ लाख रुपये आणि एक टी २० मॅच खेळण्यासाठी ३ लाख प्रत्येक खेळाडूला मिळतात. याशिवाय BCCI खेळाडूला प्रदर्शन बघून बक्षीस देखील देते. मागील वर्षी जसप्रीत बुमराहने कर्णधार विराट कोहलीला कमाईच्या बाबतीत मागे टाकले होते. बुमराहला मॅच फिसमधून १.३८ कोटी मिळाले होते तर कोहलीला १.२९ कोटी रुपये.
आयपीएल हे देखील खेळाडूंना कमाईचे मोठे साधन बनले आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर जावं लागलं तरी ठरलेली रक्कम मिळते. या सिजनला दुखापतीमुळे बाहेर गेलेल्या दिल्लीच्या श्रेयस अय्यरला ७ कोटी एकही मॅच न खेळता मिळणार आहेत. शिवाय खेळाडूंना मॅच फीस देखील मिळते. तर आयपीएल जिंकलेल्या संघातील खेळाडूंना बक्षिसाच्या रकमेचा देखील हिस्सा मिळतो.