आपल्या देशात राजकारणात यश मिळवण्यासाठी राजकीय वारसा महत्वाचा आहे हेच चित्र सर्वत्र आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात असून नेत्यांचे मुलं, नातेवाईकच राजकारणात मोठ्या पदापर्यंत पोहचतात असं चित्र आहे. पण यामध्ये असे असंख्य उदाहरणं आहेत जे नेते कुठलाही राजकीय वारसा नसताना राजकारणात आले आणि आज ते एक लोकनेते बनले आहेत. राजकारणात शून्यातून विश्व निर्माण केलेले असंख्य उदाहरणं आज बघायला मिळतात.
महाराष्ट्रात देखील कुठलाही राजकीय वारसा नसताना राजकारणात यश मिळवलेले अनेक नेते आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात येऊन ग्रामपंचायत सदस्य ते थेट आमदार पर्यंत प्रवास करणारे नेते म्हणजे पारनेरचे आमदार निलेश लंके. निलेश लंके हे २०१९ ला राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून येत आमदार बनले.
खूप संघर्षमय आहे निलेश लंके यांचा राजकीय जीवनप्रवास-
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हंगा गावात १० मार्च १९८० रोजी निलेश लंके यांचा जन्म झाला. निलेश लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके हे जिल्हापरिषद शिक्षक तर आई शकुंतला या गृहिणी. निलेशला लहानपणीपासूनच कुस्तीचं वेड होतं. त्यामुळे गावात आणि परिसरात पैलवान म्हणून ओळख बनली. निलेश शाळेत असतानाच सामाजिक उपक्रमांची आवड होती.
शाळेतच निलेश लंके गावात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असत. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी देखील आजकाल राजकीय वारसा लागतो. पण निलेश लंके यांनी याला भेद देत अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड लागते हे जेव्हा निलेश लंके त्यावेळी त्यांनी २००५ साली सर्वप्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना घरातूनच विरोध झाला. कॉलेज जीवनातून बाहेर पडल्यावर त्यांनी हि निवडणूक लढवली.
निलेश लंके यांनी फिटर ग्रेडमध्ये नगर मध्ये आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. त्यावेळी त्यांना सुपा एमआयडीसी मधील एका कंपनीत २-३ वेळा मुलाखत दिली पण काम काही मिळाले नाही. त्यावेळी निलेश लंके यांना एका मित्राने सांगितले कि तिथे आमदाराच्या चिट्ठीशिवाय काम मिळत नाही. त्यावेळी ते अनेकांकडे चिट्ठीसाठी फिरले पण चिट्ठी काही मिळाली नाही.
पुढे त्यांना नगरमध्ये कायनेटिक कंपनीत काम मिळाले. पण गावात राजकारणात जास्त गुंतल्याने त्यांचा हा जॉब देखील गेला. त्यानंतर खर्च दाखवण्यासाठी त्यांनी हंगा स्टॅण्डवर एक छोटं चहाचं हॉटेल सुरु केलं. हॉटेल चालू केल्यानंतर त्यांचे दुधाचे पैसे देखील कधी वसूल झाले नाही. पण त्यांच्या स्वभावामुळे त्यांना धंद्यात यश आलं नाही.
२००७ मध्ये निलेश लंके यांनी शिवसेनेकडून पंचायत समितीची निवडणूक लढवली पण अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झाला. खिशात एक रुपयाही नसताना त्यांनी हि निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमुळे गावाचा त्यांच्यावर विश्वास बसला कि हा काही तरी करू शकतो. नंतर ते २०१० मध्ये गावचे सरपंच पण झाले. पण एक वर्षच गावात कायापालट करून पद सोडलं. त्यांच्या गावात दरवर्षी सरपंच बदलला जातो.
निलेश लंके हे साधं मिसरूड फुटलेलं नसताना शिवसेनेचे तालुका प्रमुख बनले. पुढे २०१२ ला पत्नी पंचायत समिती सदस्य तर २०१७ ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. शिवसेनेत त्यांचं वजन वाढत असतानाच २०१८ मध्ये उद्धव ठाकरे पारनेर येथे आले असता त्यांच्या सभेत गोंधळ घातला हा आरोप त्यांच्यावर झाला. ज्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली.
पण सर्वसामान्य जनता पाठीमागे उभी राहिल्याने निलेश लंके यांना उभारी मिळाली. त्यानंतर त्यांनी पूर्ण ताकतीने निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडूनही निलेश लंके याना विधानसभेचे तिकीट मिळाले. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निलेश लंके ६१ हजार मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले.